नाशिक – सामाजिक कार्यकर्त्या भारती ठाकुर यांच्या निमाड अभ्युदय रुरल मॅनेजमेंट अॅण्ड डेव्हलपमेंट असोसिएशन या संस्थेची मध्यप्रदेश सरकारच्या संस्कृती संचालनालयाने ‘नानाजी देशमुख’ राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. दोन लाख रुपये रोख, सन्मान पत्र या संस्थेला देण्यात येणार आहे. २०१९ च्या मध्य प्रदेशच्या संस्कृती संचालनालयाच्या निवड समितीच्या बैठकीत सर्वसंमतीने ही निवड करण्यात आली आहे.
भारती ठाकुर या नाशिकच्या असून त्यांनी मध्य प्रदेशमध्ये वास्तव करुन तेथे मोठे शैक्षणिक काम उभे केले. ‘नर्मदालया’च्या माध्यमातून त्यांचे एक तपाहून अधिक काळ हे काम सुरू आहे. नर्मदा किनारी मुलांच्या शिक्षणाची दयनीय परिस्थिती लक्षात घेऊन हे काम सुरू करण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून शालेय शिक्षणाच्या जोडीने व्यवसाय प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येते. आज नर्मदालयाचे काम मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात कसरावद तालुक्यात सुरु आहे. येथील परिसरात हजारो मागास व वंचित मुलांपर्यंत ते पोहोचले आहे. या शैक्षणिक कामांबरोबरच भारती ठाकुर या लेखिका म्हणूनही प्रसिध्द आहेत. त्यांचे ‘नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा’ हे पुस्तकही सर्वांच्या पसंतीस उतरले आहे. त्याचप्रमाणे त्यांचे विविध विषयांवरील लेखही अनेक मोठ्या वर्तमानपत्रात सातत्याने प्रसिध्द होत असतात.