पंडित दिनेश पंत, नाशिक
आज (शुक्रवार, २४ सप्टेंबर) भरणी श्राद्ध आणि संकष्टी चतुर्थी आहे. दोन्ही एकाच दिवशी असल्याने चतुर्थीचा उपवास करणाऱ्यांना काही प्रश्न सतावत आहेत. चतुर्थीचा उपवास चंद्रोदयानंतर सोडला जातो. आज भरणी श्राद्ध असल्याने तो दुपारी सोडावा का, असा प्रश्न विचारला जात आहे. आधी आपण भरणी श्राद्ध म्हणजे काय ते जाणून घेऊ या. पितृपक्षातील पंधरा दिवसात ज्या दिवशीचे नक्षत्र भरणी असेल त्या दिवशी भरणी श्राद्ध करण्याचा शास्त्र अर्थ आहे. वर्ष श्राद्ध यायच्या आधी जर पितृपक्ष येत असेल तर त्यातील भरणी श्राद्ध करावे. भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्यास तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी श्राद्ध केल्याचे महात्म्य असते, असा शास्त्रार्थ आहे. आज संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी येत आहे. जे नेहमी चतुर्थीचा उपवास करतात त्यांनी चंद्रोदयानंतरच उपवास सोडावा. पण, दुपारी श्राद्धासाठी केलेलेच अन्नपदार्थ रात्री चंद्र उदयानंतर चतुर्थीचा उपवास सोडताना भक्षण करावे. रात्री स्वतंत्र स्वयंपाक करू नये.