मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतरत्न सचिन तेंडुलकर कुठल्याही वादात पडत नाही. काही प्रमाणात वाद त्याच्याकडे स्वतःहून आले आहेत. पण त्याचा फार परिणाम झाला नाही. मात्र आता माजी मंत्री बच्चू कडू सचिन तेंडुलकरला अडचणीत पकण्याच्या तयारीत आहेत. एका प्रकरणात सचिनने माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली असून लवकरच ते वकिलामार्फत नोटीस बजावणार आहेत.
सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत. भारतरत्न असलेल्या व्यक्तीचा आदर्श तरुण पिढीसमोर असतो. अशावेळी या व्यक्तीने चुकीचं कृत्य केल्यास त्याचा समाजावर आणि तरुण पिढीवर परिणाम होऊ शकतो. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमची जाहिरात केली आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे जुगाराचं समर्थन केलं आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांच्या या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कधी आंदोलन करणार हे बच्चू कडू यांनी जाहीर केलं नाही. मात्र, लवकरच हे आंदोलन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं आहे.
ऑनलाईन गेमची जाहिरात करणं मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना भोवणार असल्याची चिन्हे आहेत. सचिन यांनी ऑनलाईन गेमची जाहिरात केल्यामुळे आमदार बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत. ही जाहिरात केल्याबद्दल सचिन तेंडुलकर यांना 30 तारखेला वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. तर भारतरत्नाने कुठली जाहिरात करावी आणि कुठली नाही याची आचारसंहिता आहे. त्यामुळे आता सचिन यांना वकिलामार्फत नोटीस पाठवल्या नंतर आंदोलनाची घोषणा करू अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांना मागणी
सचिन तेंडुलकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सरकारने सचिन यांच्याशी बोलावे आणि त्यांना या जाहिरातीतून माघार घ्यायला लावावी असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे. तसेच सचिन तेंडुलकर यांनी या जाहिरातप्रकरणी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही बच्चू कडू यांनी केली आहे.
Bharatratna Sachin Tendulkar Trouble CM Complaint