मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस पक्षाचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात आज नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आगमन होणार आहे. काँग्रेसबरोबरच विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून भारत जोडो यात्रेचे स्वागत केले जाणार आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या देशभर चर्चेचा विषय आहे. आज महाराष्ट्रात यात्रेला सुरुवात होणार असून, रात्री नऊ वाजता पदयात्रा प्रारंभ होऊन वन्नाळीकडे प्रयाण करणार आहे.
पदयात्रेकरूंच्या हातात मशाली असतील, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. या पदयात्रेत माजी मंत्री आणि ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे देखील सहभागी होणार आहेत. ९ नोव्हेंबरला नांदेड येथे आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होतील. आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटातील काही खासदार आणि आमदार देखील या यात्रेत सहभाग घेणार आहेत. याबाबत महाविकास आघाडीने तयारीही सुरु केली आहे. आदित्य ठाकरेंच्या सहभागाने महाविकास आघाडी आणखी मजबूत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
https://twitter.com/INCMaharashtra/status/1589480336383438848?s=20&t=9ieiTxEx0qf8KmGpPvTEdA
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हेदेखील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे, अशी चर्चा रंगली होती. मात्र यात्रेत आपण सहभागी होण्याचे अजून ठरले नसल्याचे उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच शरद पवारांची प्रकृती ठीक असल्यासच ते सहभागी होतील, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. तसेच, भारत जोडो यात्रेत पहिल्यांदाच रात्री मशाल यात्रा निघणार आहे. ८ नोव्हेंबरला शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी यांची जयंती आहे. त्यामुळे रात्री बारा वाजता गुरुद्वारात जाऊन खासदार राहुल गांधी हे दर्शन घेणार आहेत.
https://twitter.com/AshokChavanINC/status/1589466738223386624?s=20&t=xJokywqh1W91AfOilA4bsw
पाच जिल्हे, चौदा दिवस
ही यात्रा नांदेडमध्ये चार आणि हिंगोली जिल्ह्यात चार दिवस मुक्काम करून विदर्भात वाशिममधून मार्गक्रमण करणार आहे. नांदेड जिल्ह्यातील पहिला मुक्काम देगलूर येथे राहील. मंगळवारचा मुक्काम शंकरनगर रामतीर्थ, बुधवारी – वझिरगाव फाटा, गुरुवार- पिंपळगाव महादेव आणि शुक्रवारी पहाटे हिंगोली जिल्ह्याकडे रवाना होणार आहे. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून १४ दिवस ही यात्रा तब्बल ३८४ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू असून राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये राहुल गांधींच्या यात्रेत शरद पवारांच्या सहभागाची उत्सुकता आहे. तसेच राहुल गांधींना महाराष्ट्रात किती प्रतिसाद मिळतो हे आगामी १५ दिवसांत दिसून येणार आहे.
https://twitter.com/INCMaharashtra/status/1589221368255905792?s=20&t=xJokywqh1W91AfOilA4bsw
Bharat Jodo Yatra Aditya Thackeray Participation
Congress Politics