मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो पदयात्रेचे आता काही दिवसांतच महाराष्ट्रात आगमन होणार आहे. राज्यातील या यात्रेची सध्या जय्यत तयापी सुरू आहे. त्यासाठी काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते व्यस्त आहेत. दक्षिणेतील राज्यांमध्ये या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता राज्यातही त्याला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला दि. ७ सप्टेंबरपासून तमिळनाडूतील कन्याकुमारी पासून प्रारंभ झाला आहे. सुमारे १५० दिवस चालणारी ही यात्रा १२ राज्यांमधून जात असून, ३५०० किमी अंतर पार करणार आहे. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने ही यात्रा काढली हे स्पष्टच आहे. एकीकडे भाजपने मिशन २०२४ ची घोषणा करून आतापासूनच लोकसभेच्या निवडणुकीचे जणू काही तयारी सुरू केली असताना काँग्रेसने देखील भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जणू काही या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले आहे असे म्हटले जाते. विशेष म्हणजे आपल्या राज्यात सुमारे १५ दिवस या पदयात्रेचा मुक्काम असेल, त्यावेळी विविध सामाजिक गटांशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत. तसेच नांदेड व शेगाव येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत.
केवळ ही काँग्रेसची पदयात्रा नाही तर यात सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्ते सहभागी आहेत. तसेच सामाजिक संघटना व संस्था देखील सहभागी असल्याचे सांगण्यात येत असले तरी राज्यात दोन्ही सभांमधून काँग्रेसने शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरविले आहे, असे म्हटले जाते. गांधी यांनी कन्याकुमारीपासून सुरु केलेली भारत जोडो यात्रा तामिळनाडू, केरळ ही दोन राज्य पार करुन सध्या कर्नाटकमध्ये पोहोचली होती. सोनिया गांधी आज भारत जोडो यात्रेत जक्कनहळी येथील पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. आता हे पदयात्रा तेलंगणामध्ये दाखल झाली आहे.
विशेष म्हणजे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दररोज सुमारे २५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण करते. सोनिया गांधी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आणि काही अंतर त्या पदयात्रेत चालत होत्या. यावळी सोनिया गांधी यांच्या पायातील बुटाची लेस सुटली. तेव्हा राहुल गांधी यांनी खाली बसून सोनिया यांच्या बुटाची लेस बांधून दिली. या दोघांचे हे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तेलंगणातून महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला यात्रेचे आगमन होत आहे.नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथून यात्रेचा महाराष्ट्रात प्रवेश होईल.
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांचा महाराष्ट्रात १७ दिवसांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु त्यात आता थोडा बदल करण्यात आला असून राज्यात १४ दिवस पदयात्रा चालेल, असे सांगण्यात ही पदयात्रा प्रामुख्याने मराठवाडय़ातील दोन व विदर्भातील तीन जिल्ह्यांमधून जाणार आहे. राज्यातील पदयात्रा यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे सारे नेते, प्रमुख पदाधिकारी सध्या तयारीला लागले आहेत. राहुल गांधी यांचा राज्यातील दौरा यशस्वी करण्याची जोरदार तयारी सुरू आहे.
नांदेड येथे राहुल गांधी यांची पहिली जाहीर सभा होणार आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा हा जिल्हा असून राहुल यांच्या सभेच्या निमित्ताने चव्हाण यांचेही शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे. दुसरी मोठी जाहीर सभा शेगावला होणार आहे. त्या दृष्टीने राज्यातील नेत्यांची जोरदार तयारी सुरू आहे. भारत जोडो पदयात्रेचा दि. ७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत जळगाव-जामोदमधून ही यात्रा पुढे मध्य प्रदेशात जाणार आहे. मात्र या पदयात्रेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत की नाही याबाबत अद्याप चर्चा सुरूच आहे.
Bharat Jodo Padyatra Maharashtra Tour
Congress Rahul Gandhi Politics