नाशिक – आठ महिनयांनंतर महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे व्यावसायिक नाटकाचा पडदा उघडला जाणार आहे. मराठी रंगभूमीवरील विक्रमादित्य नाटक “पुन्हा सही रे सही” ने कालिदासाचा रंगमंच पुन्हा उजळणार आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटे नंतर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कालिदास कलामंदिर बंद ठेवण्याची वेळ आले होती. शासनाने करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन लागू केल्याने शिवाय करोनाच्या नियमावलीत पहिला बडगा नाट्यगृहावरच उगारला गेल्याने नाट्यगृह बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षात अवघी तीनच महिने कशीबशी नाट्यगृह सुरु होती.
शासनाने आखून दिलेल्या नियमावलीनुसारच शनिवार १३ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळ ६:०० वाजता भारत जाधव यांच्या “पुन्हा सही रे सही” या नाटकाचा प्रयोग होणार आहे. सध्या फक्त ५०% आसन क्षमतेत हा प्रयोग होणार आहे. या प्रसंगी बोलताना प्रसिद्ध अभिनेते आणि “पुन्हा सही रे सही” या नाटकाचे निर्माते भरत जाधव यांनी जो पर्यन्त १००% आसन क्षमतेची परवानगी मिळत नाही तो पर्यंत मुंबई बाहेरील प्रयोग हे आमच्यासाठी तोट्याचेच असणार आहे; तरीही रंगभूमीपासून दुरावलेल्या रसिकांना पुन्हा थिएटर कडे आणण्यासाठी आणि एकूणच नाटकांवर अवलंबून असलेल्या लोकांसाठी हे प्रयोग करणे गरजेचे आहे. मागील दोन वर्षे सतत तणावाखाली असलेल्या प्रेक्षकांना चार घटका निखळ आनंद आम्ही या नाटकाद्वारे देऊ शकतो हेच आमच्यासाठी महत्वाचे आहे.
तिकीटाचे दर न वाढवता होणाऱ्या या प्रयोगाच्या तिकीट विक्रीचा शुभारंभ दिनांक १० नोव्हेंबर पासून कालिदास येथे होत आहे. शासकीय सर्व नियम, सोशल डिस्टनसिंग आणि शक्य त्या सगळ्या गोष्टी पाळून नाटक बघण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. नाशिक येथील हा प्रयोग फ्रेंड्स सर्कल चे जयप्रकाश जातेगांवकर यांच्या सहकाऱ्याने होत आहे.