नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील प्रगती मैदानावर आयोजित भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात खादीची जबरदस्त चलती आहे. त्यामुळेच भारतीय खादी उत्पादनांच्या दालनात तब्बल १२ कोटी ६ लाख रुपयांची जबरदस्त विक्री झाली आहे. देशाच्या विविध भागातून आलेल्या तसेच परदेशातील ग्राहकांनी खादीच्या खरेदीला पसंती दिल्याचे पहायला मिळाले.
भारतीय खादी उत्पादनांच्या दालनात, ग्रामीण भागातील खादी कारागिरांनी उत्पादित केलेली सर्वोत्तम दर्जाची खादी वस्त्रे, ग्रामोद्योग उत्पादने; पश्चिम बंगालमधील मलमल खादी, जम्मू आणि काश्मीरमधील पश्मीना, गुजरातमधील पटोला सिल्क, बनारसी सिल्क, भागलपुरी सिल्क, पंजाबमधील फुलकरी, आंध्र प्रदेशातील कलमकारी आणि इतर अनेक प्रकारची कापूस, रेशीम आणि लोकरीची उत्पादने उपलब्ध होती. या दालनाला भेट देणाऱ्यांनी, ही उत्पादने आवडीने खरेदी केली. त्यामुळे, भारतीय खादी दालनाने 12 कोटी 06 लाख रुपयांच्या विक्रमी विक्रीची नोंद केली.
विविध उत्पादनांच्या मागण्याही ग्राहकांनी उद्योजकांकडे नोंदवल्या. त्यामुळे सहाजिकच या उत्पादनांच्या भविष्यातील विपणनासाठी (मार्केटिंग) याचा फायदा होऊ शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे गांधीजींचं स्वप्नं असलेली खादी अशा प्रकारे जागतिक स्तरावर येत आहे आणि खादी आणि ग्रामोद्योग आयोग-(खादी अँड व्हिलेज इंडस्ट्री कमिशन- KVIC), याचे माध्यम ठरत आहे. आयोगाचे अध्यक्ष, मनोज कुमार यांनी सर्व कारागीर आणि सहभागी विक्रेते-उद्योजक यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला आणि व्यापार मेळाव्यात सहभागी झाल्याबद्दल त्यांचे आभार मानले. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने, भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा-2022 मध्ये, “खादी इंडिया पॅव्हेलियन” हे भारतीय खादी विक्री दालन उभारले होते. दालन क्रमांक 3 मध्ये, सर्वोत्कृष्ट अशी हातमागावर विणलेली खादी आणि ग्रामोद्योग उत्पादने मांडण्यात आली होती.
खादी इंडिया पॅव्हेलियनच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल” म्हणजेच ‘स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचा आग्रह त्या उत्पादनाला स्थानिक पातळीवरून वैश्विक पातळीवर घेऊन जातो’, या संकल्पनेला खऱ्या अर्थाने बळ दिलं गेलं. व्यापार मेळाव्यात खादी ग्रामोद्योग आयोगानं उभारलेल्या या ‘खादी इंडिया’ पॅव्हेलियनला, लाखो अभ्यागतांशिवाय अनेक मान्यवर, राजनैतिक अधिकारी, दूतावासांचे उच्चायुक्त, संसद सदस्य यांनी सुद्धा भेट दिली. या ‘खादी इंडिया पॅव्हेलियन’च्या संकल्पना दालनात बनवलेला महात्मा गांधीजी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा “सेल्फी पॉइंट” देखील सर्व पाहुण्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला.
Bharat International Trade Fair 22 Khadi 12 Crore Sale