विशेष लेखमाला
भारत – एक दर्शन (भाग ११)
वैदिक शिकवण
वैदिक शिकवण ही मनुष्याच्या आंतरिक जीवनासाठी उपयुक्त ठरते, हे त्या शिकवणुकीचे मोठे सामर्थ्य आहे आणि त्यामुळेच ती शिकवण नंतरच्या सर्व भारतीय तत्त्वज्ञानांचा, धर्मांचा, योगप्रणालींचा उगम ठरली.
मनुष्य भौतिक विश्वात राहतो, तो मरणाधीन असतो आणि मर्त्य अस्तित्वाच्या ‘पुष्कळशा असत्या’च्या तो अधीन असतो. या मरणाच्या अतीत होण्यासाठी, अमर्त्यांपैकी एक होण्यासाठी, त्याने असत्याकडून ‘सत्या’कडे वळले पाहिजे. त्याने ‘प्रकाशा’कडे वळले पाहिजे आणि ‘अंधकारा’च्या शक्तींशी लढून त्यावर विजय मिळविला पाहिजे. ईश्वरी ‘शक्तीं’च्या सख्यत्वाने आणि त्यांचे साहाय्य घेऊन तो या गोष्टी करतो; ईश्वरी ‘शक्तीं’च्या साहाय्यासाठी आवाहन करण्याचा हा मार्ग म्हणजे वैदिक गूढवाद्यांचे गुप्त रहस्य होते.
जगभरातील ‘रहस्यां’ना ज्याप्रमाणे आंतरिक अर्थ देण्यात आलेला असतो त्याप्रमाणेच तो येथे बाह्य यज्ञाच्या प्रतीकांना देण्यात आला आहे. ती प्रतीके मानवामध्ये देवदेवतांना आवाहन करण्याचे प्रतिनिधित्व करत असतात. ती प्रतीके मानव व देवदेवतांना जोडत असतात, त्या दोहोंमध्ये विनिमय घडवीत असतात, ती अन्योन्य साहाय्यक ठरतात आणि त्यांच्यामध्ये सख्यत्व घडवून आणतात. त्यांद्वारे माणसामध्ये देवदेवतांच्या शक्ती निर्माण होऊ लागतात; तसेच त्याच्यामध्ये दिव्य प्रकृतीची विश्वव्यापकतादेखील आकाराला येते. कारण देव हे ‘सत्या’चे रक्षक आणि संवर्धक आहेत, ते ‘अमरत्वा’च्या शक्ती आहेत, ते अनंत असणाऱ्या ‘माते’चे पुत्र आहेत. अमर्त्यत्वाकडे जाणारा मार्ग हा देवांचा ऊर्ध्वगामी मार्ग आहे, तो ‘सत्या’चा मार्ग आहे, तो एक प्रवास आहे, ‘ऋतस्य पंथः’ असे ज्याला म्हटले जाते त्या ‘सत्या’च्या धर्मामध्ये मनुष्याचे आरोहण आहे.
मनुष्य स्वतःच्या केवळ शारीरिक ‘स्व’च्या मर्यादा तोडून ‘अमरत्वा’कडे येऊन पोहोचतो असे नाही, तर तो जेव्हा त्याच्या मानसिक आणि सामान्य आंतरात्मिक प्रकृतीच्या मर्यादा तोडून, उच्चतर स्तरावर आणि ‘सत्या’च्या सर्वश्रेष्ठ अवकाशात जातो, तेव्हाच तो अमरत्वाप्रत पोहोचतो. कारण तेथेच अमरतेचा पाया आहे आणि तेथे त्रिविध ‘अनंता’चे स्वाभाविक निवासस्थान आहे. या संकल्पनांवरच वैदिक ऋषींनी मनोवैज्ञानिक आणि आंतरात्मिक साधनेची उभारणी केली. नंतर हीच साधना स्वतःच्या पलीकडे जात सर्वोच्च आध्यात्मिकतेकडे गेली आणि त्यातच उत्तरकालीन भारतीय ‘योगा’चा गाभा सामावलेला होता.
– श्रीअरविंद
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Bharat Ek Darshan Vaidik Teaching Shreearvind