विशेष लेखमाला
भारत – एक दर्शन (भाग १०)
‘वैदिक’ धर्मातील देव-संकल्पना
[ हिंदुधर्मातील देवदेवतांच्या वैपुल्याबद्दल काहीसा उपहासात्मक सूर लावला जातो. त्या देवदेवतांचे नेमके मर्म काय, हे श्रीअरविंद येथे स्पष्ट करीत आहेत. ]
जगतांची एक श्रेणी आहे आणि या विश्वामध्ये अस्तित्वाच्या पातळ्यांची एक चढती श्रेणी आहे अशी ‘वैदिक धर्मा’ची प्राथमिक कल्पना होती. त्या जगतांच्या श्रेणीसारखीच, त्याच्याशी संबंधित अशी, मनुष्याच्या प्रकृतीमध्येही चेतनेच्या प्रतलांची (planes) किंवा त्यांच्या परिमाणांची किंवा त्यांच्या स्तरांची एक चढती श्रेणी आहे, हे वैदिक धर्माने पाहिले. ‘सत्य’, ‘न्याय’ आणि ‘धर्म’ (Truth, Right and Law) यांची एक त्रयी प्रकृतीच्या या सर्व स्तरांना धारण करते, त्या स्तरांचे ती शासन करते; या त्रयीचे सारभूत स्वरूप एकच असले तरीदेखील ती विभिन्न पण सजातीय रूपं धारण करते.
उदाहरण द्यायचे झाले तर प्रकाशाची एक मालिका असते. या मालिकेमध्ये बाह्य भौतिक प्रकाश असतो; मानसिक, प्राणिक आणि आंतरात्मिक चेतनेचे वाहन असणारा असा उच्चतर आणि आंतरिक प्रकाश असतो. तसेच आणखी एक आध्यात्मिक प्रदीपनाचा उच्चतम, आंतरतम असा प्रकाश असतो.
सूर्य म्हणजे सूर्यदेव हा भौतिक सूर्याचा स्वामी होता, परंतु त्याच वेळी वैदिक द्रष्ट्या-कवींसाठी मात्र तो मन उजळविणारे ज्ञान-प्रकाश किरण देणारा आहे, तसेच तो आध्यात्मिक प्रकाशाचा आत्मा, ऊर्जा आणि शरीरदेखील आहे. आणि या सर्व शक्तींमध्ये तो एकमेवाद्वितीय, अनंत ईश्वराचे एक ज्योतिर्मय रूप आहे.
सर्व वैदिक देवदेवतांना अशा प्रकारे बाह्य, आंतरिक आणि आंतरतम अशी कार्ये असतात, त्यांना ज्ञात आणि गुप्त अशी ‘नावें’ असतात. या सर्वांची बाह्य व्यक्तित्वं पाहिली असता, त्या देवदेवता म्हणजे जडभौतिक प्रकृतीच्या शक्ती आहेत. आंतरिक अर्थाने पाहता, त्यांना काही आंतरात्मिक कार्य असते, त्यांना काही मनोवैज्ञानिक लक्षणांद्वारा ओळखले जाते. तसेच त्या देवदेवता या एका परमोच्च ‘सद्वस्तु’च्या, ‘एकम् सत्’ च्या, एकमेव अनंत ‘अस्तित्वा’च्या विविध शक्तीदेखील असतात. जाणण्यास अत्यंत कठीण असलेली ही परमश्रेष्ठ ‘सद्वस्तु’, वेदामध्ये बरेचदा ‘तत् सत्यम्’, ‘तद् एकम्’ या नावाने ओळखली जाते.
— श्रीअरविंद
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Bharat Ek Darshan Indian Vaidik Concepts Shreearvind