भारत – एक दर्शन (भाग १४)
भारतीय धर्मातील मूलभूत संकल्पना
[ ‘भारतीय’ धर्म सर्वोच्च आणि व्यापक अशा तीन आध्यात्मिक अनुभूतींवर, तीन मूलभूत संकल्पनांवर आधारलेला आहे. त्यातील दुसरी संकल्पना अशी ]
भारतीय धर्माची दुसरी पायाभूत संकल्पना अशी आहे की, ‘शाश्वत’ आणि ‘अनंता’कडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. जे मूळ ‘अनंत’ आहे त्यात अनेक अनंत आहेत, आणि या अनेक अनंतांपैकी प्रत्येक अनंत ‘शाश्वत’च आहे. आणि येथे विश्वाच्या मर्यादांमध्ये ‘ईश्वर’ स्वत:ला अभिव्यक्त करतो, आणि अनेक मार्गांनी या विश्वामध्ये तो स्वत:ची परिपूर्ती करतो. परंतु हा प्रत्येक मार्गच त्या ‘शाश्वता’चा मार्ग असतो. प्रत्येक सान्तामध्ये आपल्याला ‘अनंता’ची भेट होऊ शकते. सर्व गोष्टी या अनंताची रूपे व प्रतीके असल्याने, त्यांद्वारे आपण ‘अनंता’कडे जाऊ शकतो. ब्रह्मांडातील सर्व शक्ती त्या ‘एका’चेच आविष्कार आहेत. सर्व शक्ती त्या ‘एका’च्या शक्ती आहेत. ‘प्रकृती’च्या कार्यामागे असणाऱ्या देवदेवतांकडे, त्या एका ‘ईश्वरा’च्या विविध शक्ती आहेत ती एकाच ‘ईश्वरा’ची विविध नामरूपे आहेत अशा दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले पाहिजे आणि त्यांचे पूजन केले पाहिजे.
सर्व घटनांच्या पाठीमागे, मग त्या घटना आपल्याला चांगल्या दिसोत वा वाईट, ग्राह्य वाटोत वा अग्राह्य, भाग्याच्या वाटोत अथवा दुर्भाग्याच्या वाटोत, त्यांच्या पाठीमागे अनंत ‘चित्शक्ती’ असते. कार्यकारी ‘शक्ती’ असते, अनंताची ‘संकल्प’ किंवा ‘कायदा’ असतो, ‘माया’ असते, ‘प्रकृती’ असते, ‘शक्ती’ किंवा ‘कर्म’ असते. ‘अनंत’ निर्मिती करतो आणि ‘ब्रह्मा’ होतो, तो रक्षण करतो आणि ‘विष्णु’ होतो, संहार करतो किंवा स्वत:मध्ये सामावून घेतो आणि ‘रुद्र’ वा ‘शिव’ होतो. जी आद्य शक्ती या विश्वाला धारण करण्यासाठी आणि त्याचे रक्षण करण्यासाठी उपकारक ठरते ती किंवा जी स्वत:ची निर्मिती ‘जगत्-जननी’ म्हणून करते ती लक्ष्मी किंवा दुर्गा असते. अगदी संहारक रूप धारण करूनदेखील, जी कल्याणकारिणीच असते; तिला ‘चंडी’, ‘काली’, ‘कालीमाता’ म्हणतात.
एकच ‘ईश्वर’ विविध नामांनी आणि विविध देवदेवतांच्या रूपाने, विभिन्न गुणवैशिष्ट्यांद्वारे अभिव्यक्त होतो. ‘वैष्णवां’चा दिव्य प्रेमाचा देव आणि ‘शाक्तां’चा दिव्य शक्तिशाली देव हे दोन वेगळे देव असल्याचे भासतात, परंतु खरेतर वेगवेगळ्या रूपांमधून अभिव्यक्त होणारी ती एकच अनंत ‘देवता’ असते. व्यक्ती यांपैकी कोणत्याही नामरूपाच्या आधाराने ‘परमेश्वरा’शी संपर्क साधू शकते, ज्ञान असताना किंवा ज्ञान नसतानाही संपर्क साधू शकते; कारण अंतिमतः या नामरूपांद्वारे, त्यांच्या पलीकडे, त्यांच्या अतीत असलेला परम अनुभव घेण्यासाठी आपल्याला पुढे जाता येते.
– श्रीअरविंद
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)