विशेष लेखमाला
भारत – एक दर्शन (भाग ८)
भारताच्या विकसनाचा इतिहास
(भारताची आध्यात्मिकता आणि भारताची बहुप्रसवा सर्जनशीलता या दोन गोष्टीमध्येच ‘भारताचा आत्मा’ किंवा ‘भारतीयत्व’ आहे असे नाही. तर अजून तिसरी एक गोष्ट आहे. त्यासंबंधी श्रीअरविंद येथे सांगत आहेत…)
‘प्रखर बुद्धिमत्ता’ ही प्राचीन भारतीय स्वभावाची ताकद होती. ती एकाच वेळी कठोर आणि समृद्ध, मजबूत आणि सूक्ष्म, बलशाली आणि नाजूक होती तसेच ती तत्त्वतः विशाल आणि तपशीलाने विलक्षण होती. सुव्यवस्था आणि योजनापूर्वक मांडणी ही भारतीय स्वभावाची मुख्य प्रवृत्ती होती, परंतु ती सुव्यवस्था आंतरिक धर्माच्या आणि वस्तुंच्या सत्याच्या शोधावर आधारित होती आणि विवेकपूर्ण आचरणाच्या शक्यतेवर कायमच तिची दृष्टी होती.
भारत हा प्रामुख्याने ‘धर्म’ आणि ‘शास्त्रा’ची भूमी राहिलेला आहे. त्याने प्रत्येक मानवी किंवा वैश्विक क्रियाव्यापारांच्या आंतरिक सत्याचा, त्याच्या नियमाचा म्हणजे धर्माचा शोध घेतला आहे. शोध लागल्यानंतर, त्याला व्यापक रूप देण्यासाठी, तसेच योजनापूर्वक मांडणीचा तपशीलवार नियम वास्तवामध्ये उपयोगात आणण्यासाठी आणि तो जीवनाचाच नियम व्हावा यासाठी भारताने पुष्कळ परिश्रम घेतले.
आत्म्याच्या शोधामुळे भारताचा पहिला कालखंड प्रकाशमय होता, दुसऱ्या कालखंडात त्याने धर्माचा शोध पूर्ण केला; तिसरा कालखंड हा प्रारंभिक, साध्यासरळ, सूत्रबद्ध शास्त्राच्या तपशीलवार स्पष्टीकरणाचा होता. परंतु यातली कोणतीच गोष्ट अन्य दोन गोष्टींना वगळणारी नव्हती, तर हे तीनही घटक कायमच अस्तित्वात होते.
— श्रीअरविंद
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Bharat Ek Darshan Indian Development History