भारत – एक दर्शन
भाग ३२
भारतमातेची नवविधा भक्ती
श्रीअरविंद हे इंग्लंडहून शिक्षण पूर्ण करून भारतात परतले. महाराजा सयाजीराव गायकवाड ह्यांच्या बडोदा संस्थानाच्या सेवेत ते रुजू झाले. तेथील महाविद्यालयात अध्यापनही करीत असत. तेव्हा श्री. के. एम. तथा कन्हैयालाल मुन्शी (यांनीच पुढे ‘भारतीय विद्या भवन’ची स्थापना केली) हे त्यांचे विद्यार्थी होते. तेव्हा विद्यार्थीदशेत असताना, मुन्शी यांनी श्रीअरविंदांना प्रश्न विचारला होता, “राष्ट्रवादाची भावना कशी विकसित करता येईल?”
श्रीअरविंदांनी भिंतीवरील भारताच्या नकाशाकडे निर्देश करत म्हटले, “या नकाशाकडे पाहा. यामध्ये भारतमातेचे रूप पाहण्याचा प्रयत्न करा. शहरं, पवर्तराजी, नद्या, जंगले या साऱ्यांनी मिळून तिचा देह तयार होतो. या देशामध्ये राहणारी माणसं म्हणजे तिच्या देहातील जिवंत पेशी आहेत. आपले साहित्य म्हणजे तिची स्मृती व वाणी आहे. भारताच्या संस्कृतीचा गाभा हा तिचा आत्मा आहे. मुलांच्या आनंदामध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये तिची मुक्ती आहे. भारत ही एक ‘सचेतन माता’ आहे या भावाने तिच्याकडे पाहा. तिचे ध्यान करा आणि नवविधा भक्तीच्या योगाने तिचे पूजन करा….”
[‘भारत – एक दर्शन’ ही मालिका आज समाप्त होत आहे.]
Bharat Ek Darshan Baharat Mata Bhakti Shreearvind