भारत – एक दर्शन (भाग १९)
प्राचीन भारतातील सामाजिक व्यवस्था
श्रीअरविंद यांनी ‘भारतीय धर्माची चार तत्त्वं’ कोणती ती सांगितली. त्यात त्यांनी लिहिले होते की, ”उच्चतर पायऱ्यांसाठी ज्यांची अजून पुरेशी तयारी झालेली नाही अशांसाठी भारतीय धर्माने व्यक्तिगत आणि सामूहिक जीवनासाठी एक संरचना प्रदान केली. वैयक्तिक आणि समाजाच्या आचरणाची आणि शिस्तीची, मानसिक व नैतिक आणि प्राणिक विकसनाची एक चौकट पुरविली. ही अशी चौकट होती की जिच्यामध्ये व्यक्ती स्वतःच्या मर्यादांमध्ये राहून, स्वतःच्या प्रकृतीनुसार वागू शकत होती आणि हे सारे अशा रीतीने घडत असे की त्यामुळे अखेरीस, त्या व्यक्तीची त्या उच्चतर जीवनासाठी तयारी होत असे.”
प्राचीन समाज व्यवस्था विघटित होऊन त्यातून जातिव्यवस्था निर्माण झाली. ही जातिव्यवस्था प्राचीन व्यवस्थेचे अध:पतन आणि विडंबन आहे. भारतीय संस्कृतीमध्ये त्याला एक अतिशय वेगळा रहस्योद्घाटक अर्थ प्रदान करण्यात आला होता.
…प्राचीन भारतीय कल्पना अशी होती की, मनुष्याचे त्याच्या प्रकृतीपिंडानुसार चार वर्ग पडतात. प्रथम, वरिष्ठ वर्ग; त्यांमध्ये विद्या, विचार, ज्ञान असलेला मनुष्य येतो. दुसरा वर्ग सामर्थ्यवान, क्रियावान यांचा असतो; राज्यकर्ता, योद्धा, नेता, प्रशासक या वर्गात येतो. समाजरचनेच्या श्रेणीत तिसऱ्या स्थानावर अर्थतज्ज्ञ, उत्पादक, धनसंपादन करणारा, व्यापारी, कारागीर, कृषीउत्पादक हा वर्ग येतो… या तीन वर्गातील मनुष्यांना “दोन जन्म असणारे” अशी संज्ञा होती. यांना आपापल्या कर्तव्यांची दीक्षा दिली जात असे. आणि सर्वांत शेवटी अविकसित मनुष्यांचा वर्ग होता. वरील तीनही श्रेणींमध्ये अजूनपर्यंत बसू न शकणारा असा हा वर्ग होता… जी फक्त अकुशल परिश्रम आणि किरकोळ कामे करण्यासाठी पात्र असत ती शेवटच्या, चौथ्या वर्गात येत असत. याप्रमाणे समाजाची आर्थिक व्यवस्था समाजघटकांच्या चार श्रेणीद्वारे लावण्यात आली होती.
पहिला वर्ग समाजाला विचारवंत, वाङ्मयपंडित, कायदे करणारे, विद्वान, धर्मनेते, धर्मगुरू पुरवत असे. दुसरा वर्ग समाजाला राजे, योद्धे, शासनकर्ते आणि प्रशासक, कारभारी पुरवत असे. तिसरा समाजाला उत्पादक, शेतकरी, कलाकार, कारागीर, व्यापारी पुरवत असे. समाजाला आवश्यक असणाऱ्या सेवकांची आणि कर्मचाऱ्यांची गरज चौथ्या वर्गाकडून पूर्ण होत असे.
…..भारतीय समाजव्यवस्थेच्या (मूळ) शुद्ध कल्पनेत माणसाचा वर्ण जन्माने ठरत नव्हता, तर त्याच्या अंगच्या गुणांनी व त्याच्या आंतरिक प्रकृतीने ठरत होता; हा नियम जर काटेकोरपणे पाळला गेला असता, तर तो भारतीय समाजव्यवस्थेच्या वैशिष्ट्याची, विलक्षण श्रेष्ठतेची खूण ठरला असता. परंतु, सर्वोत्तम समाजामध्येदेखील नेहमीच काही भाग हा यांत्रिक असतो. भौतिक संकेत आणि आदर्श यांच्याकडे तो खेचला जातो. उपरोक्त सूक्ष्मतर मानसिक गुणांच्या पायावर खरीखुरी समाजव्यवस्था उभी करणे त्या काळात शक्य झाले नसावे, आणि त्यामुळे तो प्रयत्न व्यर्थ गेला. त्यामुळे (दुर्दैवाने) आपल्याला असे आढळून येते की, जन्म हाच व्यवहारामध्ये वर्णाचा पाया ठरला.
– श्रीअरविंद
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Bharat Ek Darshan Ancient Indian Social System Shreearvind