नाशिक – देशातील सर्व उत्सांवमधील सर्वात मोठा उत्सव म्हणून दिवाळीचा सण साजरा केला जातो परंतु ऐन दिवाळीच्या सणामध्ये कांदा, सोयाबीन या पिकांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर कमी का होईना मिळेल त्या दरात शेतमाल विकून दोन पैसे हातात येण्याच्या वेळेसच सलग दहा दिवस नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवल्याने शेतकऱ्यांची दिवाळी कडू झाली आहे. शेतकऱ्यां प्रति निवडणुकांत पुरतेच प्रचार सभांमधून मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या केंद्रातील व राज्यातील सरकारचे शेती संबंधीचे धोरणे असे तकलादू असल्यानेच शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की ,शेतीसाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठा त्याचबरोबर डिझेल पेट्रोलचे दर प्रचंड वाढलेले असतांनाही कांदा, सोयाबीन पिकाला अतिशय अल्प दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळत असून ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या सलग दहा दिवस बंद ठेवल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून ऐन सणासुदीच्या काळात शेतकर्यांकडे आर्थिक चणचण जाणवत आहे. सलग आठ ते दहा दिवस बाजार समित्या बंद असण्यामध्ये राज्य सरकारच्या सहकार व पणन विभागाचे मोठं अपयश असून कांदा आयात करून व सोयाबीन पेंड आयात करून कांदा, सोयाबीन पिकाचे भाव पाडण्याची कामगिरी केंद्र सरकारने केल्याने शेतकऱ्यांमध्ये राज्य व केंद्र सरकार बद्दल मोठी संतापाची भावना निर्माण झालेले आहे.