नाशिक – कलेक्टर, तहसीलदार, प्राध्यापक किंवा सरकारी निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रात सर्व नोकऱ्या करणारे नोकरदार यांचे पगार किराणा दुकानांसह हॉटेल व्यवसायिक व विविध व्यवसाय करणारे व्यवसायिक, उद्योजक, कंपन्या, यांना शाश्वत उत्पन्न व भरघोस नफा किंवा नियमित मासिक पगार असे मिळत असताना या लोकांचे सोशल मीडियावरती काही माहिती प्रसारित झाल्याचे आपणास कधी दिसले आहेत का ? असे असतांना आपण मोठ्या कष्टाने पिकवलेला कांद्याची विक्री केल्यानंतर नावा गावासह पावत्यांचे फोटोसह आपल्या आर्थिक व्यवहारांचा प्रसार सोशल मीडियावर व्हावा हे नक्कीच चुकीचे असल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सोशल मीडियातून एक मेसेज पोस्ट करुन मांडली आहे.
या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात लाखो शेतकरी कांद्याची शेती करतात. नोकरदार कामगार व्यावसायिक उद्योजक यांच्यापैकी कोणीही त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाचे जगाला हिशोब देत नाही मग आपण आपल्या कांद्याच्या उत्पन्नाचे स्रोत का जग जाहीर करावे ? असे म्हटले आहे. कांदा विक्रीच्या पावत्या सोशल मीडियावर टाकल्याने काही होत नाही हे जरी काही अंशी खरे असले तरी शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नाचे हिशोब सोशल मीडियावर जगजाहीर मांडणे चुकीचेच असल्याचे यात नमूद केले आहे.
या पोस्टमध्ये एवढेच काय पिढ्यान पिढ्या आपला शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून कांदा व्यापार करणाऱ्या कांदा आडतदार, कांदा व्यापारी, कांदा निर्यातदार यांच्या कांद्याच्या खरेदी विक्रीतून उत्पन्नाचे तपशील सोशल मीडियावर आपणास कधी कुठे दिसले आहेत का ? वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील ज्या विविध बाजार समित्यांमध्ये आपण आपला कांदा विक्री करतो त्या बाजार समित्यांनाही कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न कांदा खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून मिळत असतांनाही बाजार समित्यांचेही अचूक हिशोब आपणास आज पर्यंत कधी समजले तरी आहे का ? म्हणून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अधिकृत भूमिका अशी आहे की, आपण मोठ्या कष्टाने पिकवलेला कांद्याची विक्री केल्यानंतर नावा गावासह पावत्यांचे फोटोसह आपल्या आर्थिक व्यवहारांचा प्रसार सोशल मीडियावर व्हावा हे नक्कीच चुकीचे आहे असे म्हटले आहे.