नवी दिल्ली – कोरोनानंतर भारतात परदेशी अॅप्सना जोरदार टक्कर देणारे अनेक देशी अॅप्स आले आहेत. मग ते ट्विटरचे देशी व्हर्जन Koo असो, अथवा PUBG चे देशी अॅप बॅटलग्राउंड इंडिया असो. याच साखळीत आता Truecaller या कॉलर आयडी अॅपला टक्कर देण्यासाठी BharatCaller हे देशी व्हर्जन बाजारात आले आहे. काही बाबींमध्ये भारत कॉलर हे ट्रूकॉलरपेक्षाही पुढे आहे. तसेच भारतीय ग्राहकांना हे अॅप ट्रूकॉलरलपेक्षा चांगले अनुभव देईल, असा कंपनीच्या निर्मात्यांना विश्वास आहे.
कॉलर आयडी अॅपची गरज का
कॉलर आयडी अॅपच्या माध्यमातून तुमच्या फोनवर आलेल्या कोणत्याही अनोळखी कॉल करणार्या व्यक्तीचे नाव समजू शकते. म्हणजेच कॉल करणार्या व्यक्तीचे नाव अगदी सहज तुम्हाला कळू शकतो. संबंधित व्यक्तीचा ईमेल आयडी आणि फेसबुक आयडीसुद्धा दिसू शकतो. तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह नसलेल्या व्यक्तीची सूचना खूपच कामी येते. फोन न उचलताच तुम्हाला बँकेचा किंवा क्रेडिटकार्डवाल्यांचा फोन आहे, हे समजू शकतो. या अॅपच्या माध्यमातून फ्रॉड कॉलला तुम्ही ब्लॉक करू शकतो.
भारतकॉलर अॅपची वैशिष्ट्ये
भारतकॉलर हे अॅप युजर्सचे कॉन्टॅक्ट आणि कॉल लॉग्सला आपल्या सर्व्हरवर सेव्ह करत नाही. त्यामुळे युजर्सच्या खासगी माहितीवर कोणताच परिणाम होत नाही. तसेच कंपनीच्या कोणत्याच कर्मचार्याजवळ युजर्सच्या फोन क्रमांकांचा डाटाबेस नसतो. तसेच अशाप्रकारच्या डाटाचा अक्सेसही नसतो. या अॅपमध्ये सर्व डाटा इन्क्रिप्टेड फॉरमॅटमध्ये स्टोअर केला जातो. या अॅपचा सर्व्हर भारताबाहेर कोणीही वापरू शकत नाही. त्यामुळे भारतकॉलर अॅप पूर्णपणे सुरक्षित आहे. भारतीय आणि युजर-फ्रेंडली आहे. या अॅपचे अनावरण अनेक भारतीय भाषांमध्ये करण्यात आले आहे. त्यामध्ये इंग्रजी, हिंदी, तामिळ, गुजराती, बांगला, मराठी आदींचा समावेश आहे. अँड्रॉइ़़ड आणि आयओएस या दोन्ही युजर्सना उपलब्ध आहे. हे अॅप आतापर्यंत ६ हजार वेळा डाउनलोड करण्यात आले आहे.
कोण आहे मालक
भारतकॉलर हे अॅप किकहेड सॉफ्टवेअर्स प्रा. लि. या कंपनीने तयार केले आहे. आयआयएम बंगळुरूमधून शिकलेले प्रज्ज्वल सिन्हा आणि सहसंस्थापक कुणार पसरिचा हे कंपनीचे मालक आहेत. अॅपचे कार्यालय नोएडा आणि उत्तर प्रदेशात आहे. भारताचे कॉलर आयडी अॅप असावे असा उद्देश हे अॅप बनविण्याच्या मागे आहे.