इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवस शिल्लक असतानाच सलग दोन दिवस भारत बंदची हाक देण्यात आली आहे. स्टेट बँक कर्मचाऱ्यांनी २८ आणि २९ मार्च रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली. त्यास ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने पाठिंबा दिला. त्याचबरोबर येऊ घातलेल्या आयपीओच्या विरोधात भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) कर्मचारी संघटनांनीही २८व २९ मार्च रोजी संप पुकारला आहे. आता अन्य केंद्रीय कामगार संघटनांनीही संपात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या आणि परवा होणाऱ्या या भारत बंदमुळे अनेक सेवांना फटका बसण्याची चिन्हे आहेत.
केंद्रातील मोदी सरकारची विविध धोरणे, वाढती महागाई आदींच्या विरोधात आता विविध कामगार संघटनांनी बंदची हाक दिली आहे. त्याला आता विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे. गेल्या काही दिवसात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर, सीएनजी अशा सर्वच इंधनांचे दर कडाडले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत. या सर्वाची दखल घेत संपाची हाक देण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी तसेच, बँकांच्या खासगीकरणाविरोधात हा एल्गार असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.
दरम्यान, दोन दिवसीय हा भारत बंद यशस्वी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बँक, विमा, दूरसंचार, टपाल, वाहतूक अशा विविध क्षेत्रातील कामगार संघटना संपात उतरत असल्याने या सर्व क्षेत्रांच्या सेवा बाधित होण्याची चिन्हे आहेत.