मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसीय भारत बंदची मोठी किंमत महाराष्ट्राला चुकवावी लागण्याची चिन्हे आहेत. कारण, महाराष्ट्रातील विविध औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये अवघा दोन ते ३ दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. त्यामुळे वीज निर्मितीवर मोठा परिणाम होऊन उन्हाच्या कडाक्यात भारनियमन होण्याची दाट शक्यता आहे.
बँकेसह विविध कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळेच आज आणि उद्या असे दोन दिवस देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपात वीज निर्मिती करणाऱ्या कामगारांनीही उडी घेतली आहे. वीज कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊ नये यासाठी राज्य सरकारने मेस्मा कायदा लागू करण्याचा इशारा दिली आहे. तर, दुसरीकडे वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाचा साठा पुरेसा नसल्याचे निदर्शनास येत आहे. कोळशाचा पुरवठा करणाऱ्या वेस्टन कोलफिल्ड येथील कामगार संघटनाही संपात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे कोळशाचे उत्खनन करण्यापासून ते त्याची वाहतूक करणाऱ्या सर्वच कामगार संघटनांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातील विविध वीज निर्मिती केंद्रांवर केवळ २ ते ३ दिवस पुरेल एवढाच कोळसा आहे. दोन दिवसाच्या संपानंतरही तातडीने कोळसा मिळाला नाही तर वीज निर्मितीवर परिणाम होणार आहे. त्यातच कडाक्याच्या उन्हामुळे वीजेची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत राज्यात भारनियमन होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, याची दखल घेत राज्य सरकारने तातडीने बैठक घेऊन अन्यय पर्यायांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.