नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे बुधवारी भारत बंद राहणार आहे. राज्यांना एससी आणि एसटी गटांमध्ये वर्गीकरण करण्याची परवानगी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हा बंद पुकारण्यात आला आहे. या निर्णयामागे सर्वाधिक गरजूंना आरक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे, मात्र विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी याला कडाडून विरोध केला आहे.
या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरक्षण बचाव संघर्ष समितीने या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन सर्व व्यापारी मंडळांना केले आहे. बंदची हाक असूनही सरकारी कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये आणि पेट्रोल पंप सुरू राहणार असल्याचे बोलले जात आहे. वैद्यकीय सेवा, सार्वजनिक वाहतूक, रेल्वे सेवा आणि वीजपुरवठा यासह आपत्कालीन सेवा सुरू राहतील.