नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत कनहाडमोह गावाजवळ झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडीतेची अवस्था गंभीर आहे. मदतीचं आश्वासन देऊन 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तीन नराधमांनी दोन ठिकाणी नेऊन महिलेवर अत्याचार केले. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी महिलेल्या रस्त्याकाठी फेकून देत तिथून पळ काढला. सध्या महिलेवर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
महिलेवर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना घटनास्थळी नेऊन पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना दि. 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी अमित सार्वे आणि मोहम्मद अन्सारी या दोघांना पोलिसांनी घटनास्थळी नेऊन तपास सुरु केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावपासून लाखनीपर्यंत सर्व सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरु आहे.
कनहाडमोह गावाजवळ झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडीतेची अवस्था गंभीर आहे. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली असून आणखी शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याची माहिती आहे. 30 जुलै ते दोन ऑगस्ट दरम्यान 35 वर्षीय महिलेवर कनहाडमोह गावाजवळ वेगवेगळ्या आरोपींनी सामूहिक बलात्कार केले होते. त्यानंतर ती गावकऱ्यांना गंभीर अवस्थेत महामार्गाच्या शेजारी आढळली होती.
सदर पीडित महिला पतीपासून विभक्त झाली होती. नुकतीच ती गोंदियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती. दरम्यान, 30 जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्यानं तिनं रात्रीच्या सुमारास घर सोडलं. ती गोंदियातील जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कमरगाव या ठिकाणी आईकडे जाण्याच्यासाठी ती निघाली. रस्त्यात भेटलेल्या अज्ञात आरोपीनं तिला घरी सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं. पण या नराधमानं पुढे तिला घरी सोडलं नाही, तर गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन 30 जुलैला तिच्यावर पाशवी अत्याचार केला.
आणखी भयानक म्हणजे हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही, त्यानं दुसऱ्या दिवशीही म्हणजेच, 31 जुलैला पळसगाव जंगलात नेऊन अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला तिथेच सोडून आरोपीनं पळ काढला. पीडिता कशीबशी जंगलातून निघून भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावातील धर्मा ढाब्यावर पोहोचली. तिथे दुचाकी दुरुस्त करणाऱ्या दुसऱ्या आरोपीसोबत तिची भेट झाली. त्यानंतही घरी सोडण्याच्या बहाण्यानं पीडितेवर पाशवी अत्याचार केले.
या आरोपीनं आपल्या एका मित्राला सोबत घेत 1 ऑगस्ट रोजी पीडीतेला निर्मनुष्य ठिकाणी नेत पीडितेवर वारंवार अत्याचार केले. त्यानंतर पीडितेला कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळ मोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजता विवस्त्र अवस्थेत सोडून तिथून पळ काढला. रात्रभर पीडिता असह्य वेदनांनी विव्हळत रस्त्याशेजारी पडून होती. दरम्यान पहाटे गावकऱ्यांनी पीडितेला पाहिलं. विवस्त्र, रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती.
दरम्यान, काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचा संशय आल्यानं गावकऱ्यांनी तात्काळ कारधा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तिला दाखल केलं. वैद्यकीय तपासणीत महिलेवर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. तर दुसरीकडे सुरुवातीचा गुन्हा गोंदिया जिल्ह्यात घडल्यानं भंडारा पोलिसांनी संबंधित गुन्हा गोंदियाच्या गोरेगाव पोलिसांकडे वर्ग केला आहे.
महिलेला सुरुवातीला तिला भंडाराच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची गंभीर अवस्था लक्षात घेत तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिथेही तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. प्रचंड रक्तस्त्राव होत असल्यामुळं सुरुवातीला डॉक्टरांनी ते थांबवण्याचे प्रयत्न केले. नंतर आवश्यक असलेली कोलोस्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली. अजूनही काही शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याचे सांगण्यात येते.
पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून आरोपी विरुद्ध कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कारधा पोलीस करत आहेत. यात संपूर्ण गुन्हांत 3 आरोपींचा समावेश असल्यानं आता फक्त 2 आरोपी भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. तर या गुन्हाची सुरुवात गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव येथे झाल्यानं भंडारा पोलिसांनी गोरेगाव पोलिसांना 2 संशयित आरोपींसह गुन्हाचा तपास वर्ग केला आहे. दरम्यान या घटनेची उच्चस्त्रीय चौकशी करावी अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती व आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
एसआयटी चौकशी स्थापन
गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार नाही असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांशी देखील चर्चा केली. पीडित महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कुठलीही हयगय यात होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासानाला दिले आहेत.
Bhandara Women Gang Rape SIT Investigation Crime