भंडारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुमसर तालुक्याच्या पिपरा येथे पत्नीने सासरी येण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केल्याने ती जागीच ठार झाली. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या सासुवरही या संतापी जावायाने वार केल्याने ती महिला देखील जखमी झाली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने पतीला आजन्म जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आता या प्रकरणाची जिल्हाभरात सर्वत्र चर्चा सुरू आहे
म्हणून व्हायचे भांडण
तुमसर तालुक्यातील आष्टी येथील रहिवासी शालू हिचा पिपरा येथील शिशुपाल बर्वे ( वय ४१ , रा. पिपरा) याच्यासोबत सन २००६ मध्ये विवाह झाला होता. दोन वर्षे पतीसोबत राहिली. त्यांना दोन अपत्य झाली आहेत.
शिशुपाल याला दारू पिण्याच्या सवय होती. याच कारणावरून शालू व शिशुपालमध्ये नेहमी भांडण होत असे. कामधंदा नसल्याने शालू आपल्या आईकडे आष्टी येथे राहण्यास आली होती तिच्या सोबत तिचा पती शिशुपाल देखील आला होता. येथे देखील तो कुठलाही कामधंदा करीत नव्हता. दारूचे व्यसन सुरूच होते. याच कारणावरून शालूच्या आईने जावयाला तिथून हाकलले होते. याचा त्याला राग आला होता, त्या संतापाच्या भरात मार्च २०२१ मध्ये एके दिवशी शिशुपाल हा आठवडी बाजारात पोहोचला. पत्नी भाजीपाल्याची दुकान बंद करीत असतानाच शिशुपाल हा कुऱ्हाड घेऊन तिथे आला. तसेच पत्नी माझ्यासोबत आपल्या घरी राहायला चल, असे म्हणाला. मात्र शालूने जाण्यास नकार दिल्याने शिशुपालने शालूवर डोक्यावर, मानेवर कुऱ्हाडीने वार केला. यात शालूचा जागीच मृत्यू झाला. मुलीला वाचण्यासाठी गेलेल्या तिच्या आईवरही शिशुपालने प्रहार केला. यात ती गंभीर जखमी झाली.
पोलिसांचा कसून तपास
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळ गाठून तपासाला प्रारंभ केला. तसेच शिशुपालला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. खुणे यांनी साक्ष व पुराव्यांच्या आधारे शिशुपाल मंगलदास बर्वे याला खुनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता दुर्गा तलमले, विनोद भोले यांनी बाजू मांडली. पत्नीला अशा प्रकारे पत्नीचा अशा प्रकारे खून करणाऱ्या आरोपीच्या शिक्षा झाल्याने महिलांनी योग्य न्याय मिळाल्याचे म्हटले आहे.
bhandara court sentence husband murder wife
crime legal imprisonment tumsar