इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून उद्या, ७ जानेवारीपासून खासदार भजन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ११ जानेवारीपर्यंत नागपुरातील सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
मंगळवार, ७ जानेवारीला मध्य नागपुरात श्री संत कोलबा स्वामी हॉल मंगळवारी येथे सेवासदन संस्थेच्या अध्यक्ष सौ. कांचनताई गडकरी आणि अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस गुरुकुंज मोझरीचे जनार्दनपंत बोथे गुरुजी यांच्या विशेष उपस्थितीत खासदार भजन स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष प्रगती पाटील, माजी महापौर अर्चना डेहनकर आदींची प्रमुख उपस्थिती असेल.
भजन स्पर्धेत नागपुरातील ५७८ भजनी मंडळांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. स्पर्धेत प्रत्येक मंडळाला पहिले गीत म्हणून गवळण गीत, अभंग आणि दुसरे गीत म्हणून पारंपरिक लोकगीत, जोगवा, गोंधळ, भक्तिगीत सादर करायचे आहे. अशी दोन गीते आठ मिनिटांच्या आत सादर करायची आहेत. या खासदार भजन स्पर्धेचे संयोजक डॉ. श्रीरंग वराडपांडे असून आयोजन समितीत अमोल ठाकरे, विश्वनाथ कुंभलकर, माया हाडे, रेखा निमजे, सपना सागुळले, श्रद्धा पाठक, श्वेता निकम, सुजाता कथोटे, रंजना गुप्ता, अभिजित कठाले आदी कार्यरत आहेत.
अशी होईल प्राथमिक फेरी
मंगळवार, दि. ७ जानेवारीला मध्य व उत्तर विभागाची प्राथमिक फेरी श्री संत कोलबा स्वामी सांस्कृतिक हॉल, जुनी मंगळवारी सीए रोड येथे होईल. बुधवार दि. ८ जानेवारीला पूर्व विभागाची प्राथमिक फेरी संताजी हॉल, छापरू नगर येथे, गुरूवार दि. ९ जानेवारीला दक्षिण विभागाची प्राथमिक फेरी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, उदय नगर रिंग रोड येथे, शुक्रवार दि. १० जानेवारीला दक्षिण पश्चिम विभागाची प्राथमिक फेरी छत्रपती सभागृह, वर्धा रोड येथे आणि शनिवार दि. ११ जानेवारीला पश्चिम विभागाची प्राथमिक फेरी श्रीराम मंदिर, राम नगर येथे आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत ही स्पर्धा होईल.
युवा आणि ज्येष्ठ गट
खासदार भजन स्पर्धेत यावर्षी भजनी मंडळांसाठी युवा वयोगटातून (२१-३५ वर्षे) पाच पुरस्कार आणि ज्येष्ठ वयोगटातून (३५ ते ७० वर्षे) सात पूरस्कार देण्यात येणार आहे. २१ हजार, १५ हजार, ११ हजार, ७ हजार, ५ हजार अशी पुरस्काराची रक्कम असेल. महाअंतीम फेरी कविवर्य सुरेश भट्ट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित असून विजेत्या मंडळांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल.