इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – संत भय्यू महाराजांच्या आत्महत्येच्या बातमीने सर्वांनाच धक्का दिला होता. त्यांच्या आत्महत्येसाठी दोषी ठरलेले सेवेकरी विनायक, पलक आणि शरद यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण आता त्यांनी भय्यू महाराजांचा किती मानसिक छळ केला हे समोर आले आहे. या छळामुळे ते तणावात गेले होते. तसेच त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. या छळातूनच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
शरद आणि विनायक भय्यू महाराजांना झोपेच्या गोळ्या खाऊ घालत होते. न्यायालयीने सुनावणीदरम्यान हे तथ्यही समोर आले की, जेव्हा महाराजांना गोळ्या खाऊन झोप येत असे तेव्हा विनायक आणि शरद पलकला त्यांच्या खोलीत घेऊन जात आणि त्यांचा व्हिडिओ बनवून दाखवून ब्लॅकमेल करत असत. झोपेच्या अवस्थेतच विनायक आणि शरद भय्यू महाराजांची पलकसोबत काही छायाचित्रेही काढली होती. त्याचा वापर करूनच ते त्यांचा मानसिक छळ करत होते.
न्यायालयाने महाराजांची पत्नी आयुषीला महत्त्वाची साक्षीदार मानले आहे. आरोपी महाराजांना कोऱ्या धनादेशावर स्वाक्षरी करून घ्यायचे, असे आयुषीने निवेदनात म्हटले आहे. महाराजांनी चेकवर सही करण्यास नकार दिल्यावर विनायकने त्यांच्या हातातील चेकबुक हिसकावून घेतले. नंतर महाराजांनी आयुषीला सांगितले की, तिघेही मला खूप त्रास देतात. पलक मला वारंवार घाबरवते. पलक वारंवार भय्यू महाराजांवर लग्नासाठी दबाव टाकत होती. एकदा पलकने भय्यू महाराजांवर त्यांच्या वाढदिवसाला गुजरातला येण्यासाठी दबाव आणला. ते वाढदिवसाला जायला तयार नव्हते तरी त्यांच्यावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव टाकला. त्यामुळे त्यांना गुजरातला जावे लागले. पलकला पाहून महाराजांना टेन्शन यायचे.
घरगुती वाद म्हणून हा तपास बंद करण्यात आला होता. भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचा तपास आधी तत्कालीन सीएसपी मनोज रत्नाकर यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी केलेल्या चौकशीत महाराजांनी घरगुती वादातून आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर पत्नी आयुषी आणि मुलगी कुहू यांच्यातील वादाची बरीच चर्चा झाली. पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर महाराजांचा चालक कैलास याने खटल्यातील वकील निवेश बडजात्या यांना फोनवरून धमकी दिली. यानंतर भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यात आली आणि त्यात पलक, विनायक आणि शरद यांची नावे समोर आली. पुन्हा तपास करण्यात आल्यामुळेच दोषी सापडू शकले.