भगवान विश्वकर्मा जयंती
भगवान विश्वकर्मा यांची आज जयंती आहे. भगवान विश्वकर्मा यांना पौराणिक शास्त्र तसेच हिंदू मान्यतेनुसार जगतकर्ता देव शिल्पी अशा विविध नावांनी ओळखले जाते. आज त्यांच्याविषयीच आपण जाणून घेणार आहोत..

व्हॉटसअॅप – 9373913484
पिता वास्तुदेव व माता अंगिरसी यांच्या पोटी भगवान विश्वकर्मा यांचा जन्म झाला. त्यांना रिद्धी, सिद्धी, सज्ञा व नल अशी अपत्ये होती. यातील रिद्धी सिद्धी यांचा विवाह भगवान गणेश-गणपती यांच्याशी झाला. तर सज्ञा हिचा विवाह भगवान सूर्य देव यांच्याशी झाला. भगवान विश्वकर्मा यांना वास्तुशास्त्र तसेच विविध प्रकारची भव्य अद्भुत तसेच दैवी शक्तीने सामर्थ्यवान अस्त्र त्याचप्रमाणे भव्य राज प्रासाद-नगरनिर्माण याचे मूळ जनक मानले जाते. त्यांनी त्यांच्या दीर्घ अशा अवतार काळात असंख्य अस्त्र-शस्त्र राजप्रासाद, नगर निर्माण यांच्या भव्य दिव्य अशा निर्मिती केल्या.
पुराण शास्त्रानुसार सत्ययुगात स्वर्गलोक, त्रेतायुगात सुवर्णाची लंका, द्वापारयुगात श्रीकृष्णाची द्वारकानगरी तर कलियुगात हस्तिनापूर इंद्रप्रस्थ याची निर्मिती भगवान विश्वकर्मा यांनी केली होती. सर्वच वेद, उपनिषद यातील मान्यतेनुसार इंद्रपुरी, यमपुरी, वरूण पुरी, कुबेर पुरी, पांडव पुरी, सुदामापुरी, शिवमंडल पुरी अशा अनेक पौराणिक नगरांचे निर्माण भगवान विश्वकर्मा यांनी केले. या सर्व युगांमध्ये झालेल्या युद्धातील महत्त्वाच्या मुख्य योद्ध्यांची अस्त्र-शस्त्र त्यांनीच बनवली होती.
भगवान शंकराचा त्रिशूळ, भगवान विष्णूचे सुदर्शन चक्र, महारथी कर्ण याचे कवच कुंडल त्यांनीच बनवले होते. भगवान श्रीराम व रावण युद्धामध्ये वानरसेनेस श्रीलंकेत जाण्यासाठी रामसेतू बांधताना मदत झालेले नल -निल यातील नल हा भगवान विश्वकर्मा यांचा पुत्र होता. भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त दरवर्षी जगभरातील विविध प्रकारच्या निर्माण कार्यातील असंख्य अभियंते व सर्व प्रकारातील त्यांचे कारागीर सहकारी हे भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून उत्सव साजरा करतात.