कानपूर (उत्तर प्रदेश) – भारतात कुठल्या घटनेचे काय परिणाम होतील, हे सांगता येत नाही. आता उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील ही घटनाच बघा ना. एका साध्या परवानगीसाठी काही लोक अधिकाऱ्याकडे गेले आणि त्याने मिशीवर ताव खात एक डायलॉग फेकला. पण या डायलॉगने असा कहर केला की अधिकाऱ्याला चांगलेच ट्रोल करण्यात आले. या अधिकाऱ्याला भोवलेला डायलॉग आहे ‘जाओ भगवान का आधार कार्ड लेकर आओ‘. जाणून घेऊया नेमके काय घडले…
बांदा येथील रामजानकी मंदिराच्या साडेतेरा एकर जमिनीवर गव्हाचे पिक आले, पण त्याची विक्री होऊ शकली नव्हती. मंदिर समितीचे लोक जिल्हाधिकाऱ्याकडे गेले आणि विक्रीसाठी परवानगी मागू लागले. तर महाशयांनी पुजारी व मंदिर समितीच्या लोकांना देवाचे आधार कार्ड घेऊन या असे सांगितले. हा डायलॉग अंगलट आल्यानंतर अधिकारी बॅकफूटवर आला आणि नियमांनुसार जमिन ज्याच्या नावावर असेल त्याचे आधार कार्ड घेऊन या असे आपल्याला म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण त्याने दिले.
बांदा येथील खुरहंड गावात रामजानकी मंदिर आहे. याठिकाणी महंत रामकुमारदास नावाचे पुजारी आहेत. या परिसरातील साडेतेरा एकर जमीन मंदिराच्या नावावर आहे. या जमिनीतून येणाऱ्या पिकाची विक्री करून मंदिराची देखभाल आणि पुजा–अर्चना होते. एप्रिलमध्ये येथील खरेदी केंद्रात गव्हाच्या विक्रीसाठी आनलाईन नोंदणी केली होती. त्यावेळी लेखपालाने सत्यापनासाठी म्हटले होते. मात्र कोरोनामुळे त्याचे सत्यापन होऊ शकले नाही.
मे मध्ये लेखपालाने स्वतःकडूनच कार्यवाही केली. पण एसडीएमने ते रद्द केले. विचारणा केली असता ज्याच्या नावावर जमीन आहे, त्याचे आधारकार्ड अनिवार्य आहे, असे सांगण्यात आले. मंदिराच्या संरक्षकाचे आधार कार्ड चालणार नाही. मग जमीनच देवाच्या नावावर आहे तर त्यांचे आधार कार्ड तरी कुठून आणणार, हा प्रश्न निर्माण झाला आणि अधिकारी अडचणीत आला.