नाशिक – घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक मंदिरे खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे भगूरची प्रसिद्ध असलेल्या रेणुका माता मंदिरात भाविकांना ई-पासद्वारे सकाळी ५ ते रात्री १० वा.पर्यंत प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्थ व पुजारी देविदास चिंगरे व महेश चिंगरे यांनी दिली आहे. कोरोना अद्याप पूर्णपणे संपला नसल्याने गर्दी होऊ नये म्हणून भाविकांच्या दर्शनासाठी सोयीसाठी मंदिर व्यवस्थापन समितीने देवीच्या दर्शनासाठी http://bhagwatidevitrust.org या वेबसाईटवर ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नोंदणी करतांना १० वर्षावरील ते ६५ वयापर्यंत ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहे, अथवा ७२ तासाच्या आतील आरटीपीसीआर रिपोर्ट किंवा २४ तास आधीचा अँटीजेन टेस्ट रिपोर्ट ज्यांच्याकडे आहे अशा भाविकांना तो सादर केल्यावर ई-पास मिळणार असून दर्शनाला जाताना तोंडावर मास्क व शारीरिक अंतर पाळणे आवश्यक असणार आहे. यावेळी कोणत्याही प्रकारचे फुले, हार, नारळ भाविकांनी मंदिरात नेऊ नये. दर्शनासाठी बेरिकेटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. आरतीच्यावेळी देखील केवळ ५ भाविकांना प्रवेश असणार आहे. त्यामुळे पहाटे दुपारी व सांयकाळच्या आरतीसाठी भाविकांनी गर्दी करू नये. याशिवाय मंदिरात १९ सीसीसीटीव्ही कार्यरत असणार आहे. यावर्षी लामरोड युवक व शिवनेरी स्पोर्ट्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने साजऱ्या करण्यात येणाऱ्या १२ वे वर्षी राजस्थानच्या मणिबंध मणिदेविक या शक्तिपीठाचा देखावा सादर केला जाणार आहे. त्याबरोबर माळावरची देवी महालक्ष्मी माता, रविवार बाजार भागातील श्री मरीमाता मंदिर, शितळामाता मंदिर, गुरुद्वारा रोडवरील महालक्ष्मी माता, देवळालीची माताराणी श्रीनी बोर्ड, श्री गणेश सोशल फाउंडेशन येथेही घटस्थापना करून नवरात्रोत्सवास साजरा केला जाणार आहे.