इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – रोजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या दैनंदिन कामातून वेळ काढून प्रत्येकालाच वर्षातून एकदा तरी सहलीला जावेसे वाटते. ही सहल एखाद्या पर्यटन स्थळाचे असो, किंवा धार्मिक तीर्थक्षेत्राची. सध्या भारताचे पर्यटन क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. मात्र, कोविडच्या काळात पर्यटन क्षेत्राला प्रचंड नुकसान सहन करावे लागले. पण कोविड बंदी संपल्यानंतर पर्यटन क्षेत्रात पुन्हा वाढ होत आहे. आपण जर भारतातील पर्यटन व तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचा विचार करत असाल, भारतातील सर्वोच्च तीर्थक्षेत्रे व पर्यटनस्थळे कोणती आहेत? याची माहिती जाणून घेऊया…
सांस्कृतिक स्थळे :
OYO च्या अहवालानुसार, वाराणसी, तिरुपती, पुरी, अमृतसर आणि शिर्डी ही भारतातील सर्वोच्च तीर्थक्षेत्रे म्हणून उदयास आली आहेत. ‘इंडियाज ट्रेझर ट्रोव्ह ऑफ कल्चरल ट्रॅव्हल 2022’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत श्रीनगरला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत सुमारे 3.5 पट वाढ झाली आहे. 2022 मध्ये बुकिंगच्या बाबतीत श्रीनगर हे भारतातील सर्वोच्च तीर्थक्षेत्र ठरले आहे. श्रीनगर नंतर, पहलगाम आणि जम्मू ही भारतातील सर्वोच्च सांस्कृतिक स्थळे आहेत. OYO च्या बुकिंग डेटानुसार, जानेवारी ते एप्रिल 2022 दरम्यान श्रीनगर, पहलगाम, बोधगया आणि शिर्डी ही भारतातील सर्वोच्च सांस्कृतिक स्थळे राहिली.
सर्वात मोठे आध्यात्मिक केंद्र :
वाराणसी हे भारतातील सर्वात मोठे आध्यात्मिक केंद्र म्हणून उदयास आले आहे. 2022 मध्ये भारतातील सर्वोच्च धार्मिक स्थळांपैकी वाराणसी हे सर्वात लोकप्रिय ठिकाण म्हणून निवडले गेले आहे. त्यानंतर तिरुपती, पुरी, अमृतसर आणि शिर्डी यांचा क्रमांक लागतो. जर आपण ओयोच्या मिड समर व्हेकेशन इंडेक्सबद्दल बोललो तर यासाठी वैष्णोदेवीची निवड करण्यात आली आहे.
सर्वोत्तम वारसा स्थळे :
हेरिटेज साईट्सबद्दल सांगायचे तर औरंगाबादच्या अजिंठा आणि वेरूळ (एलोरा) आणि आग्राचा ताजमहाल या स्थळांना पहिल्या क्रमांकावर तर हम्पी, खजुराहो आणि महाबलीपुरमचा समावेश टॉप-5 हेरिटेज साईट्समध्ये करण्यात आला आहे. भारताच्या पर्यटन अर्थव्यवस्थेत सांस्कृतिक पर्यटनाचा मोठा वाटा आहे. गेल्या काही वर्षांत भारताच्या देशांतर्गत प्रवासाच्या यादीत सांस्कृतिक स्थळांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.