कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगावची निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातून एकमेव पाटगावची निवड होणे ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. या गावातील उपक्रमांची दखल देशपातळीवर होणे ही अभिमानास्पद बाब असून हा कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे. हा उपक्रम देशातील पथदर्शी उपक्रम ठरेल, अशा शब्दात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी हा उपक्रम राबविणाऱ्या सर्वांचे कौतुक करुन पाटगावला राष्ट्रीय स्तरावरही नामांकन मिळण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
शाश्वत विकासाचा पथदर्शी प्रकल्प राबविणाऱ्या पाटगावची सामाजिक, नैसर्गिक, आर्थिक निकषाच्या आधारे या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतून केवळ 50 गावे या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवडली गेली असून यातील फक्त 10 गावांची निवड अंतिम फेरीसाठी होणार आहे.
वैविध्यपूर्ण निसर्ग संपदेने नटलेल्या पाटगाव परिसरात ‘मधाचे गाव पाटगाव’ या उपक्रमांतर्गत पाच ग्रामपंचायतीमध्ये याठिकाणी तयार होणाऱ्या शुद्ध व नैसर्गिक मधाची निर्मिती, विक्री व मध पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहे, यामुळे ही गावे स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा नियोजन समितीच्यावतीने पाटगाव मध्ये ‘मधाचे गाव पाटगाव’ हा उपक्रम राबविण्यात येत असून महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सुरुवातीपासून प्रोत्साहन दिले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी यासाठी सहकार्य केले. मध निर्मिती व विक्री व्यवसायाबरोबरच या ठिकाणच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वेळोवेळी बैठका घेउन सुक्ष्म नियोजन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील तसेच नाबार्ड, खादी व ग्रामोद्योग विभागासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम केले आहे. मध उत्पादक, विक्रेत्यांसह महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन देत पाटगावसह आजूबाजूच्या गावांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी नाबार्डच्या सहकार्यातून या ठिकाणी ‘पाटगाव मधउत्पादक शेतकरी कंपनी’ स्थापन केली आहे. या माध्यमातून मध निर्मिती प्रक्रिया व विक्री उद्योगाला चालना देण्यात येणार आहे.
पाटगावच्या मधाचे ब्रँडींग, पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटींगसाठी आवश्यक ती तयारी होण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वेळोवेळी बैठका घेवून सुक्ष्म नियोजन केले आहे. अधिकाधिक मध उत्पादकांना प्रशिक्षण देणे, प्रशिक्षण घेवून तयार होणाऱ्या मधपाळांना मधपेट्या देणे, मध उद्योगाला आवश्यक कर्ज पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याशिवाय पाटगावसह शिवडाव, अंतुर्ली, मठगाव, तांब्याची वाडी या ग्रामपंचायती अंतर्गत सर्व गावांतील प्रत्येक घरांतून मधपाळ तयार होण्यासाठी भर देण्यात येत आहेत. या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून पाटगाव परिसरातील नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
या उपक्रमाच्या माध्यमातून पाटगाव परिसरातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी कोल्हापूर ते पाटगाव मार्गावर माहितीफलक लावण्यात आले आहे. तसेच पर्यटन संचालनालयाच्यावतीने पर्यटकांसाठी या ठिकाणी न्याहारी व निवासाची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी सुविधा अधिक दर्जेदार पध्दतीने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पाटगावमध्ये मधु मक्षिकापालनाबाबत माहिती देणारे माहिती केंद्र तयार करण्यात आले आहे. लवकरच या ठिकाणी हनी पार्क (मध उद्यान) तयार करण्यात येत आहे. याठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांना मधाच्या पेट्या, मधनिर्मिती प्रक्रिया पाहता येणार आहे. याठिकाणी सुरु होणाऱ्या सामुहिक सुविधा केंद्रात पाटगाव परिसरात तयार होणाऱ्या मधाचे संकलन प्रक्रिया व विक्री होणार असल्यामुळ येणाऱ्या पर्यटक व नागरिकांना शुद्ध व नैसर्गिक मध व त्यापासून तयार होणारी दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल.
Best Rural Tourism Village Kolhapur District First Patgaon
Honey Village