मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईतील बेस्टच्या पतपेढीसाठी होणा-या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाली आहे. दोन्ही पक्षाच्या युतीचे पॅनल या निवडणुकीत उतरले आहे. आज १८ ऑगस्ट रोजी ही निवडणुक होणार आहे. या निवडणुकीत ठाकरे गट २१ पैकी १९ तर मनसे २ जागा लढत आहे. तर महायुतीने सहकार पॅनल रिंगणात उतरवले आहे. त्यात प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, निलेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिंदे सेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांचा समावेश आहे. या निवडणुकीत तिसरे पॅनलही आहे. मंगळवारी १९ तारखेला मतमोजणी होणार आहे.
विशेष म्हणजे अनेक वर्षे या पतसंस्थेवर सत्ता असणा-या उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले असून एेन मतदानाच्या आदल्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेची या निवडणुकीत एन्ट्री झाली आहे. गेल्या चार वर्षापासून ही निवडणूक रखडली होती. या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युती केल्यामुळे या निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकी अगोदर या दोन्ही ठाकरे बंधुची लिटमस टेस्ट असल्याचे बोलले जात आहे.
या निवडणुकीत शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेनेची युती झाली आहे. त्यांनी प्रणि उत्कर्ष पॅनल तयार केले असून त्यांच्या पोस्टरवर ठाकरे ब्रॅण्ड असे लिहले आहे.