नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना 3 लाख रूपयापर्यंत विनानिविदा काम देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय काम वाटप समिती नियुक्त करण्यात आली आहे. याकरीता शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी कामाचे प्रस्ताव विहित प्रपत्रात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयात वेळेत सादर करावेत, असे सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय व निमशासकीय कार्यालयातील विविध प्रकारची 3 लाख रुपयांची कामे नोंदणीकृत कार्यरत सेवा सोसायट्यांना विना निविदा देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. याकरीता जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांनी त्यांच्याकडील होणारी दैनंदिन व्यवहाराची कामे, आवश्यक सेवा, साफसफाई, स्वच्छतेची कामे तसेच विविध कंत्राटदारामार्फत करण्यात येणारी कामे बेरोजगारांच्या सहकारी संस्थामार्फत करून घेण्यासाठीचे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे, अशी माहितीही सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. सेवा सोसायट्यांना कामे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी किमान वेतन अधिनियम, 1948 अंतर्गत तरतुदीतील दरानुसार कामगार कर्मचाऱ्यांना वेतन मिळेल अशा पद्धतीने कामाचे प्रस्ताव विहित प्रपत्रात सादर करावे, असेही शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.