इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडीयमजवळ काल झालेल्या चेंगराचेंगरी बाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे सद्यस्थिती अहवाल मागितला आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा विजय साजरा करण्यासाठी झालेल्या कार्यक्रमात हजारो क्रिकेटप्रेमींनी विविध प्रवेशद्वारांमधून प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात ११ जणांचा मृत्यू झाला तर ३३ जण जखमी झाले. या संदर्भात दाखल झालेल्या स्युओमोटो जनहित याचिकेवर गुरुवारी न्यायालयाने हे निर्देश दिले. पुढची सुनावणी येत्या मंगळवारी १० जून रोजी होणार आहे.
या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकारने दहा लाख रुपये मदत जाहीर केली. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडूनही १० लाखाची मदत देण्यात आली.
दरम्यान कर्नाटक सरकारने मोठी कारवाई केली आहे. राज्य सरकारने दुर्घटनेनंतर पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. राज्य सरकारने पोलीस आयुक्तांव्यतिरिक्त,अतिरिक्त पोलिस आयुक्त, मध्य विभागाचे डीसीपी, एसीपी, क्यूबन पार्क पोलिस स्टेशनचे निरीक्षक, स्टेशन हाऊस ऑफिसर आणि क्रिकेट स्टेडियमचे प्रभारी यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले.