इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सतर्कतेचा कितीही इशारे, सूचना दिल्या तरी अजूनही ऑनलाईन फसवणूक होताना दिसतेच. यातही मुलींना याचा जास्त फटका बसतो. अशाच प्रकारे महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न करणाऱ्या एका व्यक्तीला कर्नाटकात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ऑनलाईन ऍपद्वारे महिलांशी ओळख वाढवून आणि खोटे आश्वासन देऊन त्यांच्याशी लग्न करून त्यांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मैसूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. मॅट्रिमोनिअल साईटवर आपले नाव नोंदवून आरोपीने हा प्रताप केला आहे. विशेष म्हणजे स्वतः पाचवी पास असलेला हा आरोपी महिलांना इंजिनिअर आणि डॉक्टर असल्याचे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा आणि शेवटी त्यांच्याशी लग्न करायचा. २०१४ पासून आतापर्यंत आरोपीने १५ महिलांशी लग्न केले. या बायकांकडून त्याला ४ मुले असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
महेश केबी नायक (३५) असे अटक आरोपीचे नाव आहे. बंगळुरूच्या बनशंकरी येथील तो रहिवासी आहे. एका महिलाने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी एक टीम तयार केली. अखेर तुमकुरू येथून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फक्त पाचवीपर्यंत शिकला आहे. मात्र, त्याच्या जाळ्यात अकडलेल्या महिला उच्चशिक्षित आणि त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. तरीही बदनामीच्या भीतीने या महिला आरोपीविरोधात तक्रार दाखल करत नव्हत्या. लग्नानंतर काही दिवस तो महिलांसोबत राहायचा आणि नंतर पळून जायचा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश हा स्वत:ला इंजिनियर किंवा डॉक्टर म्हणवून घ्यायचा. डॉक्टर असल्याचा दावा सिद्ध करण्यासाठी महेशने तुमाकुरू येथे एक बनावट दवाखानाही सुरू केला. लोकांचा त्याच्यावर विश्वास बसावा यासाठी त्याने एक नर्स देखील ठेवली होती.
असा झाला प्रकार उघड
महेशने यंदाच जानेवारीत म्हैसूरमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीशी लग्न केले. मुलीच्या आई वडिलांकडून महेशने हुंडाही घेतला होता. लग्नानंतर काही काळ सुरळीत सुरू होते. त्यानंतर महेशने या महिलेला पैशासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. महिला सुरुवातीला महेशला तिच्या कमाईचे पैसे देत होती. त्यानंतर महेशने तिच्यावर दबाव बनवण्यास सुरुवात केली. हॉस्पिटल बांधण्यासाठी माहेरहून पैसे आण असा दबाव महेश पत्नीवर टाकत होता. जेव्हा महिलेने नकार दिला तेव्हा महेशने तिचे दागिने आणि घरातील रोकड घेऊन पसार झाला.