इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात कोण कुणाची कशी फसवणूक करेल हे सांगता येत नाही. विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून तर फसवणुकीचे खूपच प्रकार वाढले आहेत. त्यामुळेच सायबर गुन्ह्याची पोलिसांकडे मोठ्या प्रमाणावर नोंद होत असते. परदेशातून भारतात लग्न करण्याच्या उद्देशाने आलेल्या इंग्लंडमधील एका इसमाची अशीच फसवणूक झाली. एका तरुणी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून चक्क एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे लूबाडले. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचे काही पैसे परत मिळाले, मात्र त्याला आता समाजात तोंड दाखवायला जागा शिल्लक नाही. कारण त्या महिलेने त्याला ब्लॅकमेल करण्याची धमकी दिली आहे.
सॉफ्टवेअर इंजिनिअरलाच गंडवले
परदेशातून भारतात आलेल्या एका इसमाची अशाच प्रकारे फसवणूक झाली असून आता त्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे ब्रिटनमधील हा इसम सॉफ्टवेअर अभियंता असून त्याची फसवणूकीची एक मोठी घटना समोर आली आहे. एका महिलेने लग्नाचे वचन देत तरुणाकडून सुमारे १ कोटी रुपयांहून अधिक पैसे उकळले. एका विवाह नोंदणी साईटवर या तरुणाने आपले नाव नोंदवले होते. येथून तरुणीने त्याला चक्क नग्न होत व्हिडिओ कॉल केला आणि त्याच्याकडून पैसे उकळले आहेत. विशेष म्हणजे तो परदेशी तरुणही तिच्या बोलताना बळी पडला. मात्र या प्रकरणामध्ये आपल्या देशाची बदनामी झाली, असे देखील दिसून येत आहे.
आई आजारी
या संदर्भात पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेला इसम ४१ वर्षीय असून तो आपल्या कामामधील प्रशिक्षणासाठी तो बंगळुरू येथे आला होता. त्याला लग्न करायचे होते, त्यामुळे त्याने लग्नाच्या वेबसाइटवर नोंदणी केली होती. बनावट प्रोफाइल असलेल्या एका महिलेने साइटवर त्याच्याशी मैत्री केली. काही दिवस मेसेजवर दोघांचे बोलणे झाले, त्यानंतर दोघांनी त्यांचे मोबाईल नंबर एकमेकांना शेअर केले. महिलेने या व्यक्तीशी लग्न करण्यास सहमती दाखवली. तसेच माझ्या वडीलांचे निधन झाले असून मी आईसोबत राहते असे त्या तरुणीने सांगून त्याला कॉल केला होता. माझी आई आजारी असून तिच्या औषधासाठी पैसे हवे आहेत, असे तिने त्याला सांगितले तेव्हा त्याने तरुणीला तात्काळ दिड हजार रुपये दिले. त्यानंतर तिने त्याला व्हिडिओ कॉल केला. यावेळी कॉलवर बोलताना तिने स्वत:चे कपडे काढले आणि नकळ तो कॉल रेकॉर्ड केला. नंतर तिने ही क्लिप त्याला पाठवली. इतकेच नाही तर तरुणीने तरुणाच्या पालकांसोबत देखील ही व्हिडिओ शेअर करण्याची धमकी दिली. या बदल्यात आपल्या बँक खात्यांमध्ये १ कोटी १४ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्याने पैसे पाठवले पण आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना महिलेच्या खात्यामधील ८४ लाख रुपये परत मिळवले आहेत.