मुंबई – जुन्या पिढीतील लोकांनी सल्ला दिल्यावर आपण त्याकडे फारसे लक्ष देत नाही. विशेषतः प्रकृतीच्या संदर्भात, तब्येतीच्या संदर्भात चार चांगले उपाय सांगितले तरीही ते गांभिर्याने घेण्याचा काळ आता मागे लोटला आहे. मात्र त्यामुळे नव्या पिढीचेच नुकसान जास्त आहे. अॅरोमा थेरेपीच्याबाबतीतही तसेच काहीसे झाले. मात्र ही थेरेपी शरीरासाठी किती लाभदायक आहे, हे आपण आज जाणून घेऊया.
साध्या सोप्या शब्दात सांगायचे तर अॅरोमा थेरेपी म्हणजे झाड, पान, फुलांच्या रसाने औषधोपचार करण्याचा एक विधी आहे. हल्ली जीवनावश्यक तेल म्हणूनही त्याचा वापर होताना दिसतो. याअंतर्गत लॅव्हेंडर, रोज, जास्मीन आदी सुगंधांचा वापरही केला जातो. तेलाशिवाय बाम, लोशन, पावडर, क्ले मास्क, बेदिंग सॉल्ट, फेशियल स्टीमर्स, क्रीम आदींच्या स्वरुपातही ते उपलब्ध आहे.
यावर उत्तम उपाय
अॅरोमा थेरेपीचा प्रयोग मेंदू आणि शरीर या दोन्हींच्या तंदुरुस्तीसाठी केला जातो. त्यासोबत अनेक समस्यांवर उपाय म्हणून ते वापरले जाते. जसे डोकेदुखी, मायग्रेन, अंगदुखी, झोप न येणे किंवा झोपेशी संबंधित समस्या, मासविक ताण, गुडघ्यांचे दुखणे, प्रसुतीच्या वेदना कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, पाचन क्षमता वाढविण्यासाठी, विविध संक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी याचा वापर होतो.
चंदनाचा लेप
आयुर्वेदात चंदनाचेही महत्त्व मोठ्या प्रमाणात सांगण्यात आले आहे. जुन्या काळात डोके शांत ठेवण्यासाठी कपाळावर चंदनाचा टिका लावण्याचा सल्ला दिला जायता. आयुर्वेदात एकूण 11 इंद्रियांचा उल्लेख आहे. यात अकरावे इंद्रिय म्हणजे मन असे सांगण्यात आले आहे. मनात सदैव सकारात्मक विचार यावे, मन प्रफुल्लित राहावे यासाठी सुगंध उपयोगी पडतो, असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे.
सुगंधीत तेल
जोपर्यंत अॅरोमाथेरेपी हे नाव अस्तित्वात यायचे होते तोपर्यंत पारंपरिक पद्धतिने सुगंधीत तेलांचा वापर आपण मालीश करण्यासाठी करीतच होतो. गुलाब, केवडा, चमेलीसारख्या फुलांचा अर्क पुरातन काळापासून वापरला जात आहे.