बेळगाव – बेळगाव महानगरपालिकेच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपने ३५ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठा पराभव पत्करावा लागला. अवघ्या ४ जागेवरच त्यांना समाधान मानावे लागले. या निवडणुकीत काँग्रेसने १०, अपक्ष ८, एमआयएमला एक जागा मिळाली. सत्ता प्राप्त करण्यासाठी ३३ या मॅजिक फिगरची गरज आहे. त्यामुळे भाजपचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे.
या अगोदर बेळगाव महानगरपालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे ३२ सदस्य होते. यावेळी केवळ ४ जागा मिळाल्यामुळे हा मोठा धक्का मानला जातो, बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान झाले त्याचा आज निकाल लागला. मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्यासाठी या निवडणुकीत केलेल्या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. या निवडणुकीत ५८ जागेसाठी ३८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात भाजप ५५, काँग्रेस ४५, महाराष्ट्र एकीकरण समिती २१, जेडीएस ११, आम आदमी ३७, एआयएमआयएम ७ यासह अपक्ष उमेदवार होते.