विशेष प्रतिनिधी, नाशिक
शहरासह जिल्ह्यात उद्यापासून (१२ मे) १० दिवसांचा कडक लॉकडाऊन लागणार असल्याने नाशिककरांनी खरेदीसाठी तुफान गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे. दूध, किराणा, भाजीपाला, पेट्रोल, डिझेल अशा सर्व बाबींसाठी सकाळपासूनच दुकाने, पेट्रोल पंप यावर प्रचंड गर्दी झाली आहे. आगामी १० दिवसाचा साठा करण्यामागे नाशिककरांचा कल आहे. विशेष म्हणजे, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा कडक लॉकडाऊन केला जात असतानाच नाशिककरांची प्रचंड गर्दी झाल्याने कोरोनाचा आणखी फैलाव होण्याची भीती व्यक्त होत आहे.
का होतेय गर्दी
आगामी दहा दिवस किराणा, दूध मिळेल की नाही ही शंका
जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी
पेट्रोल, डिझेल पुढील १० दिवस मिळणार नाही
घरात जीवनावश्यक वस्तू असल्या तरी अधिकच्या खरेदी करण्यासाठी
आगामी १० दिवस दूध नाही मिळाले तर दूध पावडर खरेदी करण्यासाठी
भाजीपाल्याची होम डिलिव्हरी मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने
नाशिकमध्ये लागू करण्यात आलेल्या अंशत: लॉकडाऊनमुळे काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होत आहे. परंतु गेल्या तीन चार दिवसांपासून बाधितांची संख्या एका विशिष्ट मर्यादेला स्थिर झाली आहे. ही बांधितांची संख्या पुर्णत: कमी करण्यासाठी कठोर निर्णय घेवून १२ मे रोजी दुपारी १२ पासून २३ मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या कडक लॉकडाऊनच्या काळात जनतेच्या पूर्ण सहकार्याने कोरोना विरूद्धची जिंकण्याचा विश्वास आहे.
– छगन भुजबळ, पालकमंत्री व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री
—
दुसऱ्या लाटेवर मात करण्याची जवळपास ही शेवटची संधी आहे. एकीकडे गर्दीला नियंत्रित करतानाच जनजीवनावर कमीत कमी परिणाम होईल अशी रचना करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या वेळी लोकांनी नियमांचे उल्लंघन केले तर भविष्यात अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल. स्वतःच्या हिताकरिता नियमांचे १०० % पालन करावे असे आवाहन आहे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक