इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ आहे. त्यामुळे त्यासंदर्भातील माहितीची नेहमीच चर्चा होते. येत्या दोन दिवसांनी भारतीय संघ पाकिस्तानशी सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वीच माजी कर्णधार विराट कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी विषयी एक पोस्ट केली आहे. त्यामुळे त्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
गतकाळातील एकत्र खेळण्याच्या आठवणींनाच जणू काही कोहलीने उजाळा दिला आहे. विराट कोहली सध्या क्रिकेट विश्वात चर्चेत आहे. आशिया चषक 2022 सह कोहली एका महिन्याहून अधिक कालावधीनंतर मैदानात परतणार आहे. अशा स्थितीत कोहली फॉर्ममध्ये परतणार की नाही याची उत्सुकता आणखी वाढली आहे. किक्रेट तज्ज्ञ, माजी दिग्गज खेळाडू आणि चाहत्यांच्या चर्चेचा हा केंद्रबिंदू आहे. त्याचवेळी विराट कोहली सरावात व्यस्त आहे.
यूएईमध्ये (UAE) येत्या 27 ऑगस्टपासून रंगणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. काल भारतीय संघ यूएईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सराव करताना दिसला. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान येत्या 28 ऑगस्टला आमने-सामने येणार आहेत. यापूर्वी क्रिकेटपटू विराट कोहलीनं इन्स्टाग्रामवर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबतचा फोटो शेअर करून एक खास पोस्ट केलीय. “धोनीसोबत खेळणं माझ्या कारकिर्दीतील सर्वात आनंदाचा आणि रोमांचक क्षण होता”, असंही विराटनं पोस्टमध्ये लिहिले आहे.
या सगळ्यामध्ये कोहलीने अचानक एक पोस्ट शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आणि त्याचवेळी तो थोडा भावूकही झाला. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी 25 ऑगस्टच्या रात्री त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर माजी भारतीय यष्टीरक्षक आणि दिग्गज कर्णधार एमएस धोनीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आणि त्याला एक खास कॅप्शन दिले, ज्याने चाहत्यांना धक्काच बसला तसेच भावूकही केले.
विराट कोहलीनं इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये असं लिहिलंय की, “या व्यक्तीचा विश्वासू उपकर्णधार बनणं हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात आनंदाचा आणि रोमांचक टप्पा होता. आमची भागीदारी माझ्यासाठी नेहमीच खास असेल. 7+18.” विराट कोहलीच्या या पोस्टला मोठी पसंती मिळाली आहे. कोहलीच्या या पोस्टला आतापर्यंत 17 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
कोहलीने सन 2008 मध्ये धोनीच्या कर्णधारपदाखाली पदार्पण केले आणि भारतातील त्याच्या कार्यकाळात अनेक जवळचे सामने जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोहलीच्या कारकिर्दीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या धोनीनं नंतर कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्या उपकर्णधार कोहलीवर सोपवली. दरम्यान, सन 2014 मध्ये प्रथमच कोहली कसोटीत कर्णधार बनला. त्यानंतर त्याला एकदिवसीय आणि टी-20 संघांचं कर्णधारपदही मिळाले.
सध्या विराट कोहली त्याच्या कारकिर्दीतील अतिशय वाईट टप्प्यातून जात आहे. जवळपास तीन वर्षांपासून विराटची बॅट शांत आहे. त्याला या काळात एकही शतक करता आलं नाही. त्यानं आयपीएल 2022 नंतर फक्त इंग्लंड दौऱ्यावरच चांगले क्रिकेट खेळले आहे. यामुळं आगामी विश्वचषकापूर्वी त्याचं फॉर्ममध्ये येणं भारतीय संघासाठी खूप महत्वाचं असेल. कोहलीने 2012 च्या आशिया कपमध्येच धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून प्रथमच जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतरच कोहली तिन्ही फॉरमॅटमध्ये उपकर्णधार झाला.