विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भारतातील सर्वात मोठी आणि सरकारी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ८ कंपन्यांमधील त्यांचा संपूर्ण हिस्सा विकल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, एलआयसीचा आयपीओ येण्यापूर्वीच एलआयसीने हा मोठा आर्थिक निर्णय घेतल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भातील एक अहवाल मिंटमध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार, मार्चच्या तिमाहीमध्येच एलआयसीने ८ कंपन्यांमधील संपूर्ण हिस्सा विकला आहे. गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते एलआयसी ही सर्वात मोठी विमा कंपनी असून जानेवारी ते मार्च या महिन्यात एलआयसीने मोठा नफा कमावला आहे. एलआयसीने सेंट्रल बँक ऑफ इंडिया, हिदुस्थान मोर, युनियन बँक ऑफ इंडिया, ज्योती स्ट्रक्चर्स, मॉर्पेन लॅब, आरपीएसजी, इन्सेक्टिसाईड इंडिया, दालमिया भारती शुगर या कंपन्यांमधील आपला हिस्सा पूर्णपणे काढून टाकला आहे. दरम्यान, एलआयसीने एचडीएफसी, मारुती सुझुकी, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंटस या कंपन्यांमधील शेअर्सही कमालीचे घटविले आहेत.
दरम्यान, तज्ज्ञांच्या मते एलआयसीने घेतलेल्या या आर्थिक धोरणांचा कुठलाही परिणाम एलआयसीच्या विमेधारकांवर थेट होणार नाही. विमेधारकांचे पैसे सुरक्षित आहेत. त्यांनी घाबरुन जाऊ नये. मात्र, एलआयसीची एकूण भांडवल बाजारातील मूल्य यामुळे घसरले आहे, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.