नवी दिल्ली – ‘दैव तारी त्याला कोण मारी’ असे म्हटले जाते. सिंगापूरमध्ये असेच एक अतिशय आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. एका आरोपीला फाशी दिली जाणार होती आणि तो शेवटच्या क्षणी कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे यानंतर काय करावे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला.
सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालयाने अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी दोषी ठरलेल्या ३३ वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर हा प्रकार घडला. धर्मलिंगम नावाची ही व्यक्ती फाशी होण्यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. खरे तर धर्मलिंगमला बुधवारी अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी फाशी देण्यात येणार होती. त्याच्या फाशीच्या शिक्षेविरुद्धच्या अंतिम अपीलवर सुनावणीसाठी त्याला न्यायालयात आणण्यात आले होते, परंतु यावेळी न्यायाधीशांनी सांगितले की, धर्मलिंगम यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.
न्यायमूर्ती अँड्र्यू फॅंग, न्यायमूर्ती जुडिथ प्रकाश आणि न्यायमूर्ती कन्नन रमेश यांच्या खंडपीठाने सांगितले की, हा प्रकार अगदीच अनपेक्षित आहे. तसेच न्यायमूर्ती म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत त्याला फाशी देता येणार नाही. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली असली तरी पुढील तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. सुनावणी पूर्ण होईपर्यंत अर्जदाराला फाशी दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले.
धर्मलिंगम यांना केव्हा कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले, याची माहिती देण्यात आलेली नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. सिंगापूरमध्ये हेरॉईन आणल्याप्रकरणी धर्मलिंगमला २०१० मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. २०११ मध्ये उच्च न्यायालय, २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालय यांच्याकडूनही त्याला दिलासा मिळू शकला नाही. धर्मलिंगमच्या फाशीची वेळ जवळ आली तेव्हा हे प्रकरण आंतरराष्ट्रीय प्रकाश झोतात आले.
याप्रकरणी मलेशियाचे पंतप्रधान इस्माईल साबरी याकोब यांनी सिंगापूरचे पंतप्रधान ली हसीन लूंग यांना पत्र लिहून मानवाधिकार संघटना आणि व्हर्जिन ग्रुपचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांनीही त्यांना या प्रकरणात दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. इतकेच नाही तर धर्मलिंगमला माफी देण्याची मागणी करणाऱ्या ऑनलाइन याचिकेवर ७० हजार हून अधिक लोकांनी स्वाक्षरीही केली आहे.
दबावाखाली त्याने हा गुन्हा केला असून त्याची मानसिक स्थितीही ठीक नसल्याचे लोकांच्या अर्जात म्हटले आहे, असेही सांगण्यात आले आहे. सध्या सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालयाने भारतीय वंशाच्या धर्मलिंगमच्या फाशीला स्थगिती दिली आहे. जगभरातील मानवाधिकार कार्यकर्ते या फाशीला स्थगिती देण्याचे आवाहन करत होते. धर्मलिंगम यांच्या अपिलावर सुनावणी होईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे.