मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सणासुदीचे दिवस आले की, महागाई वाढते हे जणू काही समीकरणच बनले आहे. त्यातच दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या तोंडावर तर दरवर्षी किराणा मालाचे भाव वाढतात, विशेषतः खाद्यतेल व दाळींचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतात. यंदाही तोच अनुभव येत आहे. दिवाळी अवघ्या १० दिवसांवर आल्याने तयारीसाठी सर्वत्र लगबग सुरू होणार आहे. घरोघरी फराळाचे बेत आखले जात आहेत. त्यामुळे खरेदीसाठी किराणा दुकानावर गर्दी होत आहे. मात्र भाववाढीने नाराजी व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारने मागील महिन्यातच सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ केली होती. त्यामुळे मालवाहतूक देखील महागली असून त्यानंतर आता ऐन दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेल आणि डाळीच्या किंमतीत वाढ झाल्याने गृहीणी व सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा चांगलाच फटका बसणार आहे. काही दिवसांपूर्वी खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाल्याने सर्वांना दिलासा मिळाला होता. परंतु आता पुन्हा एकदा खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे.
सध्या खाद्यतेल ४ ते ५ रुपयांनी महागले आहे. मागील महिन्यात १३५ ते १४० रुपयांपर्यत असणारे खाद्यतेल आता १४५ ते १५० रुपयांना मिळत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलांच्या किंमतीत वाढ झाल्यानं या महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. दिवाळीचा सण १० दिवसांवर येऊन ठेपल्याने आता लवकरच घरोघरी फराळाची लगबग सुरू होणार असून डाळी मात्र महागल्या आहेत. नवीन माल बाजारात येण्याआधी मागणी वाढल्याचा डाळींच्या किमतीवर परिणाम होत आहे. जवळपास सर्वच डाळी११० ते १२० रुपये किलोच्या पर्यंत गेल्या आहेत.
सध्या तूर डाळीचा भाव- १२० रुपये, मुग डाळीचा भाव- ११० रुपये, उडीद डाळीचा भाव- १०५ ते ११० रुपये, चणा दाळीचा भाव ७०ते ७५ रुपये आहे. दिवाळीवेळी फराळामुळे विविध डाळींच्या मागणीत वाढ होत असते. त्याचवेळी हा सिझन डाळींचा नवीन माल बाजारात येण्याचा असतो. परंतु हा माल पूर्णपणे बाजारात येण्याआधीच मागणी वाढल्याने ग्राहकांत नाराजी व्यक्त होत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कडधान्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भात शेतीचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे डाळींचे उत्पादनही घटण्याची शक्यता असल्याने ही दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना आता अचानक खाद्यतेलाच्या आणि डाळीच्या किंमतीत वाढ झाली आहे.
काही दिवसांपूर्वी सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यानंतर आता जीवनाश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्यानं ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला फटका लागणार आहे. कारण या महिन्याच्या सुरुवातीपासून डाळ आणि खाद्यतेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. यात आणखी वाढही होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. सीएनजीचे दर वाढल्यामुळे मालवाहतूक महागल्याचे सांगण्यात येते.
Before Diwali Pulses and Edible Oil Rate Increased
Inflation
			








