वॉशिंग्टन – लसीकरणाला प्रतिसाद मिळावा म्हणून गल्लोगल्ली ऑटो-रिक्षा फिरताना आपण बघतो. चौकाचौकांमध्ये सिग्नलवरील घोषणा आपण ऐकतो. जनजागृतीचे हेच माध्यम आपण आजवर बघत आलो आहोत. मात्र अमेरिका सरकारने लस घेणाऱ्यांना बीअर मोफत देण्याची घोषणा करून साऱ्या जगाचे लक्ष वेधले आहे.
जगभरात कोरोनाचा कहर थांबलेला नाही. दररोज लाखो लोकांना संक्रमण होत आहे. मात्र तरीही लस घेण्यासाठी पुढे येण्याचे प्रमाण पाहिजे त्या प्रमाणात कमीच आहे. अमेरिकेतही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे व्हाईट हाऊसने बिअर निर्माता कंपनी Anheuser-Busch यांना लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी करून घेतले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेत ‘मन्थ आफ अॅक्शन’ची घोषणा केली आहे.
४ जुलैपूर्वीच अधिकाधिक नागरिकांना लस द्यायची आहे, असा निर्धार त्यांनी केला आहे. बायडेन यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनापूर्वी ७० टक्के लोकसंख्येला किमान पहिला डोस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंत अमेरिकेतील ६२.८ टक्के ज्येष्ठ नागरिकांना किमान एक डोस देण्यात आला आहे. याशिवाय देशातील १३.३६ टक्के लोकांना दोन्ही डोस देण्यात आलेले आहेत.
प्रगत देश म्हणून आपण अमेरिकेत वेगाने लसीकरण सुरू असेल, असा विचार करीत होतो. मात्र अमेरिकेतही लसीकरण अत्यंत संथगतीने सुरू आहे. यापूर्वी एकदा लॉटरीचा फंडा वापरण्यात आला, तेव्हा अमेरिकेत दररोज ८ लाख नागरिक लस घेण्यासाठी धावत आले. आता हेच प्रमाण २ लाखांनी घटलेले आहे. Anheuser-busch या कंपनीने घोषणा केली आहे की, बायडेन यांचे ७० टक्के लोकसंख्येचे लक्ष्य पूर्ण झाले की २१ वर्षांवरील तरुणांनाही ते मोफत बीअर देणार आहेत.