बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केजननिकच्या एका कलाकेंद्रावर पोलिसांनी धाड टाकली असून ५ अल्पवयीन मुलींसह १७ पीडीत महिलांची सुटका केली आहे. या धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. उमरी येथील महालक्ष्मी कलाकेंद्रावर हा सर्व प्रकार सुरू असल्याचे पोलीस कारवाईत उघड झाले आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी एका पक्षाचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे हे तिथे होते, मात्र लगेच पळून गेले, अशी माहिती देखील समोर आली आहे.
३६ जणांविरोधात गुन्हा दाखल
बड्या नेत्याच्या वरदहस्ताने बीडमध्ये कला केंद्राच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी कला केंद्रावर छापा टाकून ५ अल्पवयीन मुलींसह काही महिलांची सुटका केली आहे. आयपीएस पंकज कुमावत यांच्यासह टीमने या सर्व प्रकाराचा पर्दाफाश केला असून याप्रकरणात ३६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नाकर शिंदे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो ठाकरे गटाचा जिल्हा प्रमुख असल्याचे सांगितले जात आहे. या कला केंद्रावर कलेच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांनी दिली. तसेच यामध्ये मोठे रॅकेट असल्याची शक्यता देखील पोलिसांनी व्यक्त केली आहे.
बड्या नेत्याचा वरदहस्त
दरम्यान, बीड तालुक्यातील उमरी गावात सुरू असलेल्या कला केंद्र संदर्भात उमरी ग्रामपंचायत अगोदर पोलीस प्रशासनाला पत्रही दिले होते. यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या वरदहस्ताने हे सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र त्यानंतर या कलाकेंद्राच्या अड्ड्यावर जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांची स्कॉर्पिओ आणि इनोव्हा दोन्ही गाड्या मिळून आल्या आहेत. या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. कारण कलाकेंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. डीजेच्या तालावर रात्री २ वाजता काही महिला, मुली नाचत असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर या ठिकाणी दारू, गुटखा, वापरलेले कंडोम देखील आढळून आले आहेत.
ठाकरे गटाकडून हकालपट्टी
ठाकरे गटाने या सर्व गंभीर प्रकाराची दखल घेतली आहे. त्यामुळेच रत्नाकर शिंदे याची जिल्हा प्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होत आहे.