बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चहाच्या टपरीचे किती महत्त्व आहे, हे चहा शौकिनांनाच चांगल्याने माहिती आहे. पण एखाद्या चहा विक्रेत्याने तब्बल ३० लाख रुपयांना चहाची टपरी विकत घ्यावी, हे जरा अतीच झाले. आणि तेही मेट्रोसिटीमध्ये नव्हे तर एका ग्रामपंचायतमध्ये ही घटना घडली आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात डोंगरपिंपळा गाव आहे. इथली ही घटना आहे. गावाची लोकसंख्या जेमतेम साडेचार हजार. या गावात एका चहाच्या टपरीसाठी तब्बल 30 लाखांची बोली लागली आहे. ग्रामपंचायतने बांधलेल्या चार व्यापारी गाळ्यांचा लिलाव झाला आणि याचवेळी एका गाळ्यासाठी 11 महिन्यांचे भाडे म्हणून चहाच्या टपरीवाल्याने चक्क 30 लाखांची बोली लावत गाळा मिळवला.
उत्पन्न वाढवण्यासाठी ग्रामपंचायतने चार गाळे बांधले. यासाठी लिलाव घेण्यात आला. या लिलावात सहभाग घेण्यासाठी पाच हजारांची अनामत रक्कम घेण्यात आली. जवळपास दहा ग्राहक यात सहभागी झाले. सोमवारी लिलाव ठेवण्यात आला. लिलावातील बोलीचे आकडे वाढत गेले. आणि एका गाळ्याची किंमत एक लाखापर्यंत गेली. एक लाखात गाळा कोण घेणार, असे वाटत असतानाच एकाने २५ लाख रुपयांची बोली लावली. साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. आता तर विषय संपलाच, असे वाटत असताना गावात एक छोटेसे चहाचे दुकान असलेल्या माणसाने ३० लाख रुपयांची बोली लावली. त्याच्या पुढे कोणी जाणार नाही, हे साऱ्यांनाच माहिती होते. आणि शेवटी ३० लाखात त्या गाळ्याचा लिलाव झाला.
दहा बाय दहाचा गाळा
काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतने दहा बाय दहा आकाराचे चार गाळे बांधले. आर्थिक उत्पन्नात भर पडेल म्हणून ग्रामपंचायतने बांधलेले गाळे 11 महिन्याच्या करारावर भाड्याने देण्याचे ठरवले. या बोलीत चहाची टपरी, झेरॉक्स, सलून दुकानदारांनी सहभाग घेतला. पण यातील एक गाळ्याची बोली 30 लाखापर्यंत गेली. आणि त्याचीच चर्चा अधिक रंगत आहे.
Beed Tea Stall Shop Auction 30 Lakh Bid