मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कंकालेश्वर मंदिर, ता. जि. बीड या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन, दुरुस्ती कामासाठी येणाऱ्या ९,१४,५४,४०३/- (रु.नऊ कोटी चौदा लक्ष चौपन्न हजार चारशे तीन मात्र) इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
या संदर्भातील शासन निर्णय 202509241733017823 सांस्कृतिक व पर्यटन पर्यटन विभागाने जारी केला आहे. संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांना यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
कंकालेश्वर मंदिर हे बीड शहरातील एक प्राचीन आणि भव्य शिवमंदिर आहे. वास्तुशैलीवरून ते १० व्या ते १२व्या शतकादरम्यान (सुमारे १००० वर्षे जुने) बांधले गेले असावे असे मानले जाते. ते बीडच्या ऐतिहासिक वारशाचे एक प्रमुख प्रतीक मानले जाते आणि पर्यटकांसह भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. मंदिराची वास्तुकला, स्थान आणि धार्मिक महत्त्व यामुळे ते विशेष ओळखले जाते. मंदिराच्या बाह्यभागावरील शिल्पकला ही मराठवाड्यातील प्राचीन वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात या मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिराचे हे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे जतन आणि संवर्धन करण्याची मागणी अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांकडून होत होती. त्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पुढाकाराने हा विषय अखेर मार्गी लागला असून त्या संदर्भातील शासन निर्णय जारी झाला आहे.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आपल्या गेल्या महिन्यातील बीड जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह कंकालेश्वर मंदिराला भेट दिली होती आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या होत्या. कंकालेश्वर देवस्थान परिसरात नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या विकासकामांमध्ये पारंपरिक व आधुनिकतेचा संगम साधत बीडकरांना कायम स्मरणात राहील. तसंच बीडच्या वैभवात भर घालणारी, दर्जेदार कामे करावी. विकासकामं करताना ती कामे गुणवत्तापूर्ण, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यावे. भाविकांना सर्व सोयीसुविधा मिळतील अशा सर्व बाबींचा आराखड्यामध्ये समावेश करावा, असे निर्देश त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते.