बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केली आज जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली. पालकमंत्री अतुल सावे यांनी आज शिरूर का. तालुक्यातील रायमोह मंडळात ढगफुटी सदृश्य अतिमुसळधार पावसानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेतील पीडीत कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले.
भानकवाडी येथील कुंडलिक सोनसळे यांच्या दोन मुली व एक ३० वर्षीय सिरसमार्ग येथील पाहुणा साईनाथ भोसले वाहून गेला होता. तसेच दगडवाडी येथील रावसाहेब जायभाये शेतामध्ये असताना अंगावर वीज कोसळल्याने ते जागीच ठार झाले होते. त्यांनी या दुर्दैवी जायभाय व सोनसळे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. शासनाच्या वतीने जायभाय कुटुंबाला चार लक्ष रु व सोनसळे कुटुंबाला आठ लक्ष रुपये मदतीचा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी खासदार डॉ. प्रितम मुंडे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री श्री सावेयांनी दगडवाडी व भानकवाडी शिवारात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी जि.प. सदस्य वैजिनाथ मिसाळ, उपविभागीय अधिकारी नामदेव टीळेकर, तहसीलदार (शिरूर) श्रीराम बेंडे, तसेच राजेंद्र मस्के, नवनाथ शिराळे, रामदास बडे, जालिंदर सानप, संभाजी जाधव, वसंतराव सानप, सुभाष क्षीरसागर, यांच्यासह संबंधित अधिकारी, भाजपा पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सावे यांच्या उपस्थितीत आज जिल्ह्यातील माजलगाव येथील मेळाव्यानंतर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली व बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी यांची भेट व चर्चा केली. जिल्ह्यातील दौऱ्यानंतर त्यांचे औरंगाबादकडे प्रयाण झाले.
Beed Guardian Minister Farmers Visit