बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रागाच्या भरात कोण काय करेल, याचा नेम नसतो. किरकोळ कारणावरून काही जण रागाच्या भरात एखाद्याचा जीव घेतात, अशा अनेक घटना आपल्या राज्यात घडतात. अशाच प्रकारची एक भयानक दुर्घटना मराठवाड्यात घडली, तीन निर्दयी संशयीत आरोपीनीं एका शाळकरी मुलाचा किरकोळ कारणावरून जीव घेतला आणि त्याचा मृतदेह शेतातील झाडाला टांगला. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
माजलगाव तालुक्यातील नित्रुड परिसरात ही भयानक घटना घडली आली आहे. अवघ्या पंधरा वर्षांचा शाळकरी मुलगा शेतातून गेला म्हणून, त्याला बेदम मारहाण करून आधी त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका झाडाला टांगण्यात आला. याप्रकरणी तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाम मोहम्मद मुर्तुजा शेख (वय १५ वर्षे, रा.नित्रुड ) असे या मृत मुलाचे नाव आहे. तर कैलास डाके, महादेव डाके, हनुमंत वानखेडे असे संशयीत आरोपींची नावे आहेत.
इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेला गुलाम मोहम्मद हा लहान बहीण सिमरन व छोटा भाऊ हुजैफा यांना घेऊन आजोबांच्या शेतात सरपण आणण्यासाठी गेला होता. दरम्यान याचवेळी कैलास डाके, महादेव डाके आणि हनुमंत वानखेडे या तिघांनी त्याला रस्त्यात अडवून त्याला विचारणा केली की, आमच्या शेतातून का जातोस ? तसेच गुलाम याला लाथा बुक्क्याने मारहाण करून जमिनीवर पाडले भर ऊन्हात त्याला मातीत खूप मारहाण सुरु होती.
तसेच बेदम मारहाण केल्यानंतर, सरपणासाठी नेलेल्या ओढणीने तिघांनी गुलामचा गळा आवळला. त्यामुळे घाबरलेल्या गुलामची बहीण सिमरन आणि भाऊ हुजैफा यांनी पळ काढत घर गाठले. तसेच घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितल्याने घरच्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र यावेळी नित्रुडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात एका झाडाला गुलामचा मृतदेह लटकावलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे घरच्यांनी हांबरडा फोडत आक्रोश सुरू केला .
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. तसेच ही भयानक घटना गावात पसरली. त्यामुळे गुलाम याच्या नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तर आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गुलाम याच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तात्काळ तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत.
Beed Crime Farmer Small Child Murder Dispute