बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होतात. यातील काही उघड होतात तर अनेक उघड होतच नाहीत. या अनुषंगाने प्रशासन सक्रिय झाले असून, अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. पण आता बालविवाह करणाऱ्यांनी नवीन शक्कल लढवल्याचे समोर येत आहे. प्रत्यक्षात गुपचूप लग्न उरकले जात आहे. त्यामुळे अशा प्रकरणांची देखील चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. बीड तालुक्यातील कुटेवाडी येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावण्यात आला होता. त्यानंतर या मुलीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन माझे जबरदस्तीने लग्न लावण्यात आले आहे, मला मारहाण करुन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, अशी पोस्ट करत मदत मागितली होती. त्यानंतर बीडच्या ग्रामीण पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली असून, या प्रकरणी ३० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुलीची तात्काळ सुटका
बीड तालुक्यातील कुटेवाडी येथील एका १७ वर्षीय मुलीचा पालवण येथील प्रदीप मस्के याच्याशी बालविवाह झाला. मात्र मुलीची इच्छा नसताना हा विवाह लावण्यात आला होता. घरच्यांनी जबरदस्ती करुन विवाह केल्याची पोस्ट संबंधित मुलीने इन्स्टाग्रामवर केली. त्याची दखल घेत बीड ग्रामीण पोलिसांनी लागलीच दुसऱ्या तिची सुटका केली. यानंतर ग्रामसेवक दत्तात्रय लोमटे यांच्या फिर्यादीवरुन ग्रामीण पोलिस ठाण्यात ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मुला-मुलीचे आई-वडील, मामा-मामी, फोटोग्राफर व मंडपवाल्यासह नातेवाईकांचा समावेश आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.
सतत मारहाण
या अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विवाह लावण्यात आला होता. विशेष म्हणजे ही गोष्ट कोणाला सांगू नये म्हणून तिला सतत मारहाण केली जायची आणि त्यानंतर तिला जीवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात येत होत्या. रोजच्या या त्रासाला कंटाळून या मुलीने थेट इन्स्टाग्रामवर मदतीसाठी पोस्ट केली. दरम्यान याची माहिती बीड पोलीस आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ मुलीची सुटका करुन तिची रवानगी बालगृहात केली आहे.
इन्स्टाग्राम पोस्ट
मुलीने इन्स्टाग्रामवर पोस्ट मध्ये म्हटले आहे की, ‘ सर मी…. माझे काल जबरदस्ती लग्न केले. मला खूप मारलंय. नाही लग्न केलं तर मारुन टाकीन अशा धमक्या देऊन जबरदस्ती करुन माझे लग्न केलंय… प्लीज मला वाचवा… पालवण गावात मस्के सोबत लग्न केलंय माझं… मी तुम्हाला सांगितलं असं सांगू नका…. मला मारुन टाकतील…. मला इथून घेऊन जावा… प्लीज… मी कंप्लेंट करेन म्हणून मामांनी फोन जप्त केला. एकाच दिवसात लग्न केले… खूप त्रास दिलाय मला… प्लीज मला इथून घेऊन जावा…! ‘