बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून या निवडणुकीत राष्ट्रवादीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे तर भाजपचा पराभूत झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पॅनलने चांगलीच आघाडी घेतली असून भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांची मात्र यांच्या पॅनलची मात्र अनेक ठिकाणी पिछेहाट झालेली दिसून येते.
बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, गेवराई, बीड, वडवणी, आष्टी बाजार समितीचे निकाल आले आहेत. धनंजय मुंडे यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अद्याप मतमोजणी सुरू असून, १८ पैकी ११ जागा धनंजय मुंडे यांच्या वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलने जिंकल्या आहेत, उर्वरित ७ जागी धनंजय मुंडे यांच्या पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपसाठी हा धक्का समजला जात आहे.
वास्तविक परळी हा पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, धनंजय मुंडेंनी विजय मिळवत पंकजा मुंडेंना जोरदार धक्का दिला आहे. बीड जिल्ह्यातील निवडणुका धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहिण भावामुळे प्रतिष्ठेची बनली होती. दरम्यान ६ पैकी ५ बाजार समित्यांवर महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली असून, भाजपसह शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
परळी व अंबाजोगाई या दोनही बाजार समित्यांवर धनंजय मुंडे यांनी एकेरी वर्चस्व प्रस्थापित करत भाजप नेतृत्वास मोठा धक्का दिला आहे. अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत असलेल्या योगेश्वरी शेतकरी विकास पॅनलच्या १८पैकी १५जागा निवडणूक आल्या आहेत.
गेवराईमध्ये माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने १८ पैकी सर्व१८ जागा जिंकून काही जागी विरोधकांचे अक्षरश: डिपॉझिट जप्त केले आहे. वडवणी बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार प्रकाश दादा सोळंके व माजी आमदार केशवराव आंधळे यांच्या राष्ट्रवादी व महाविकास आघाडीने मिळून १८ पैकी १८ जागा जिंकल्या आहेत. बीड बाजार समितीत निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना मात देत १८ पैकी १५ जागा निवडून आणल्या आहेत. या विजयाने महाविकास आघाडीकडून जोरदार जल्लोष करण्यात येत आहे.
Beed APMC Election Politics Dhananjay Munde Pankaja Munde