बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात अचानक आलेल्या महापुरामुळे अनेक गावे जलमय झाली आणि काही तासांतच शेकडो कुटुंबे अडकून पडली. या आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देत भारतीय लष्कराने नागरी प्रशासनाच्या समन्वयाने व्यापक बचाव मोहीम हाती घेतली आहे.
दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स ब्रिगेड मधील लष्करी विमानदलाची हेलिकॉप्टर्स अल्पावधीतच पाचारण करण्यात आली. प्रतिकूल हवामान व कठीण उड्डाण परिस्थितीला तोंड देत वैमानिकांनी दुर्गम व जलमग्न भागांत प्रवेश करून अडकलेल्या नागरिकांची सुटका केली. महिलांसह मुले व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असून, सततच्या उड्डाणांद्वारे बचाव कार्य अखंडपणे सुरू आहे.
एनडीआरएफ व राज्य यंत्रणांच्या सहकार्याने राबविण्यात आलेली ही मोहीम, नागरिकांच्या जीवित रक्षणासाठी भारतीय लष्कराची अखंड वचनबद्धता आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्वरित मदत करण्याची तत्परता अधोरेखित करते.