मुंबई – पेट्रोल, डिझेल, किराणा, भाजीपाल्यानंतर आता सर्वसामान्यांसाठी आणखी एख चिंतेची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना महागाईला तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या संकटापाठोपाठ आता महागाईने डोके वर काढल्याने सर्वसामान्य व मध्यमवर्गीय मेटाकुटीला आले आहेत. त्यातच आता १ डिसेंबरपासून आणखी एक गोष्ट महागणार आहे. ती म्हणजे, टीव्ही पाहणे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय)च्या आदेशानुसार आता टीव्ही चॅनल्सचे दर वाढणार आहेत.
येत्या १ डिसेंबरपासून ट्रायचा नवा आदेश लागू होणार आहे. त्यानुसार, प्रमुख ब्रॉडकास्टिंग नेटवर्क असलेल्या स्टार, झी सोनी, व्हायाकॉम १८ या कंपन्यांनी त्यांचे चॅनल्स बुके मधून बाहेर काढले आहेत. त्यामुळे या कंपन्यांचे चॅनल्स स्वतंत्ररित्या पहावे लागणार आहेत. त्यासाठी ग्राहकांना थेट ५० टक्क्यांपर्यंत अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. २०१७ मध्ये ट्रायने टीव्ही चॅनल्सच्या दराचे आदेश दिले होते. त्यानंतर १ जानेवारी २०२० मध्ये दुसरे आदेश आले. आता तिसऱ्यांदा नवे आदेश आले आहेत. म्हणजेच, एखाद्या कंपनीचे सर्व चॅनल्स ठराविक पॅकेजमध्ये पाहिले जात आहेत. आता हे चॅनल्स स्वतंत्ररित्या पाहण्यासाठी पैसे अदा करावे लागणार आहेत. याची थेट झळ टीव्ही प्रेक्षकांना बसणार आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे ३०० रुपये महिना टीव्हीसाठी होणारा खर्च आता थेट ४०० ते ४५० रुपयांवर जाणार असल्याचा अंदाज आहे.